निलेश लंके यांच्या कोवीड सेंटरमध्ये दोन जोडप्यांचा विवाह; सनई चौघडे आणि राजेशाही जेवण
News24सह्याद्री -
कोवीड संसर्ग झालेल्या हजारो रुग्णांना दिलासा देण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले. आ. लंके आणि त्यांच्या सहकार्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाने हे सेंटर आणि आ. निलेश लंके यांचे नाव संपूर्ण देशभरात गेले. रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी मनोरंजनासह अनेक उपक्रम राबविले गेले. आता याच कोवीड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या साक्षीने आणि आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत दोन जोडप्यांचा विवाह पार पडला. पारनेरचे रहिवासी असणारे आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ठाणे शहरात वास्तव्यास असणारे सखाराम बाप्पु व्यवहारे यांचे चिरंजीव निकेत सखाराम व्यवहारे व नगर येथील कन्या आरती नानाभाऊ शिंदे आणि नगर तालुक्यातील वांजोळी येथील रहिवाशी रावसाहेब शंकर काळे यांची कन्या राजश्री व खानेगाव तालुका नेवासा येथील उच्चशिक्षित तरुणाने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात कोवीड सेंटरमधून केली. नवरदेव आणि नवरीकडील व्यक्तींनी इच्छा व्यक्त केली म्हणून या सेंटरमध्ये त्यांचा विवाह लावला असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगितले. लॉकडाऊन खुले झाल्याच्या पहिल्याच दिवशी आ. निलेश लंके यांनी त्यांच्याच कोवीड सेंटरमधून दोघा जोडप्यांचा विवाहाचा बार उडवून दिला. आ. लंके यांच्या या उपक्रमाची आता चर्चा झडू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग कायम आहे आणि लॉकडाऊन काही पमाणात शिथील केले असले तरी कोरोना कायम आहे.
No comments
Post a Comment