राजेश टोपे यांचे लॉकडाउनसंबंधी महत्वाचे विधान; म्हणाले

मुंबई -
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाची दुसरी लाट आली असे समजले जात आहे. सर्वसामान्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे. राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकट निर्माण झाल्याने लॉकडाउनबाबत चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे लोकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाउन केला जाईल असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचे विधान केले आहे. राजेश टोपे म्हणाले की मला असे वाटते की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाउनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. लॉकडाउन हा खरे तर शेवटचाच पर्याय असतो त्यामुळे याबबत सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेतला जाईल. असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी मुंबई लोकलसंबंधीही भाष्य केले आहे. लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील.असेही ते म्हणाले. याआधी राजेश टोपेंनी राज्यातील काही शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणे अटळ असेल तर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. टोपे म्हणाले राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील.
मुंबईत गेल्या आठवड्याभरात मुंबईमधील कोरोना वाढीचा दर तब्बल ०.६९ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा काळ ९७ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सोमवारी ३,२६० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत तीन लाख ६५ हजार ९१४ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ११ हजार ५९२ मुंबईकरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा ९० टक्क्यांवर घसरले आहे. सोमवारी १,३२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले. विविध रुग्णालयांमध्ये २५ हजार ३७२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात १९ हजार ३४७ चाचण्या करण्यात आल्या आहे.
No comments
Post a Comment