रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 5 पटीनं वाढवलं! आता मोजावे लागणार 50 रुपये

मुंबई -
कोरोनामुळे आता मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता मुंबई मेट्रोपोलिटन रिजन म्हणजे MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट आता 10 रुपयांवरुन 50 रुपये केली आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मध्य रेल्वेने मुंबई, पुणे, भुसावळ,आणि सोलापूर डिव्हिजनमध्ये प्लॅटफॉर्म तिकीत 10 रुपयांवरुन 50 रुपये केले होते.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचा हा निर्णय गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घेण्यात आला आहे. रेल्वेने निश्चित केलेले नवे दर 24 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. हे दर 15 जूनपर्यंत लागू असणार आहे. उन्हाळ्यात अनेक लोक सुट्ट्यांसाठी जात असतात. तसेच यात्रांसाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं काही कठोर पावले उचलली आहे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा प्रशासनही याबाबत वेळोवेळी निर्णय घेत आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, बैठका अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहे. लोकांच्या गर्दीमधूनच अनेक कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध नियमावली जारी करत आहे.
No comments
Post a Comment