अहमदनगरचं नामांतर करण्याची मागणी; भुषणसिंह होळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई -
राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असतानाच आता अजून एक शहराच्या नामांतराची मागणी होत अहमदनगर शहराचे नामांतर व्हावे अशी मागणी होत आहे. अहमदनगरचे नामांतर करुन शहराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी होळकर घराण्याच्या वंशजांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवण्यात आले आहे. भुषणसिंह होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अहमदनगरला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे.
त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वी होळकर घराण्याच्या वंशजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. वाफगावच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर लगेचच अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात अहमदनगरच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यताही जाणकार व्यक्त करत आहे.

No comments
Post a Comment