राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, राठोडांचं मुख्यमंत्र्यांवरअजूनही दबावतंत्र सुरुच
मुंबई -
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात राजकीय वातावरण चांगलच भडकलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याची माहितीही मिळत आहे. पण असे असले तरी राठोड यांचे मुख्यमंत्र्यांवर अजूनही दबावतंत्र सुरुच असल्याचे कळतंय. कारण, राजीनामा तुमच्याकडेत ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी आपण पदावरुन दूर झाल्याचे राठोड यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्यानंतर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जाणार की नाही? याबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे विरोधी पक्षांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

No comments
Post a Comment