15 फेब्रवारीपासून वर्गात 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरु: उदय सामंत
मुंबई -
गेल्या अनेक दिवसापासून कोरोनामुळं बंद असलेले महाविदयालय आता लवकरच सुरु होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील कित्येक महिन्यांपासून बंद असलेले महाविद्यालये येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी वर्गात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि विद्यापीठ प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालये आता पुन्हा सुरु केली जाणार आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होतील. याबाबत उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढवा घेतला आहे. त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 15 तारखेपासून महाविद्यालये सुरु होतील.
असे असले तरी कोरोना महामारी लक्षात घेता संबंधित विद्यापीठाचे कुलगुरु आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्याविषयी निर्णय घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक असेल, असे सामंत यांनी आवर्जून सांगितले आहे. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच दिलेली आहे. वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतीगृहाचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आलेले आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

No comments
Post a Comment