इंग्लंडच्या फिरकीसमोर टीम इंडियाचा डाव 145 धावांवर आटोपला, 33 धावांची आघाडी
मुंबई -
तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळ खेळला जात आहे. इंग्लंडच्या फिरकीसमोर टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला आहे. यासह भारताने 33 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने 5 तर जॅक लीचने 4 विकेट घेतल्या आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात 112 धावा
इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक धावा केल्या. क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.
पहिल्या दिवसखेर भारताच्या 3 बाद 99 धावा
पहिल्या दिवसखेर भारताने 3 विकेट्स गमावून 99 धावा केल्या आहेत. दिवसखेर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात नाबाद खेळत आहेत. रोहित शर्माने दिवसखेर भारताकडून सर्वाधिक नाबाद 57 धावा केल्या. तर शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या रुपात भारताने 3 विकेट्स गमावल्या.

No comments
Post a Comment