स्पेशल रिपोर्ट - 'वृत्तपत्र' क्रांतीचे एक हत्यार लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ
News24सह्याद्री - 'वृत्तपत्र' क्रांतीचे एक हत्यार लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ...पहा सह्याद्री special रिपोर्ट
आज ६ जानेवारी, हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. ६ जानेवारी १८३२ रोजी, मराठी भाषेतील आद्य पञकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. महाराष्ट्रात मराठी पत्रकारितेची सुरुवात तेव्हाच झाली असेही म्हणता येऊ शकेल.बाळशास्त्री जांभेकर मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत होते. आधीच पारतंत्र्य त्यात समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यांनी ग्रासलेला समाज पाहून बाळशास्त्री चिंता करीत असत. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, वृत्तपत्र काढावे असे त्यांना मनोमन वाटू लागले. गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला.
ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. 1832 मध्ये सुरू झालेले 'दर्पण' हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.पत्रकार दिनानिमित्त आज आपण पत्रकारिता क्षेत्रातील बदलांचा थोडक्यात आढावा घेऊ या.स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या अनेक वृत्तपत्रांनी समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक मराठी वृत्तपत्रांनी सरकारविरोधात आवाज उठवला. क्रांतीचे एक हत्यार म्हणून वृत्तपत्रांकडे पाहिले जाऊ लागले. स्वातंत्र्यानंतर समाजात काही ठोस बदल व्हावेत, स्वातंत्र्य अबाधित राहावं, यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. हे सर्व 1977 पर्यंत सुरू होतं. इतकंच नव्हे तर आणबाणीच्या विरोधातही काही पत्रकार उभे ठाकले. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या आणि सामान्यांच्या विचारांना दिशा देणाऱ्या वृत्तपत्रांमुळे हा पेशा एका वेगळ्याच उंचीवर पोचला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहण्यात येऊ लागले.
मात्र अलीकडच्या काळात अनेक भांडवलदारांनी या क्षेत्रातील संधी ओळखून एक व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्रात प्रवेश केला. पत्रकारितेला अर्थप्राप्तीची जोड मिळाली आणि जाहिराती, वाढत्या स्पर्धा, बातमी देण्याची घाई आणि समाजमाध्यमांसारखा आलेला नवा प्रतिस्पर्धी या सर्वांचा बातम्यांवर परिणाम होत गेला. समाज माध्यमांच्या या काळात ट्रेंड्स, हॅशटॅग्स आणि लाईव्ह्सवरच बऱ्याच बातम्यांचा भर असतो. अशा काळात समाजमाध्यमांमुळे माध्यमांवर लक्षणीय परिणाम झाला. सोशल मीडियामुळे वाचक, प्रेक्षक आणि ग्राहकच बदलले. बातम्या स्वीकारण्याचं माध्यम बदलल्यावर वर्तमानपत्रं, टीव्ही, वेबसाइट्स यांनाही बदलणे भाग पडले.मीडिया आता ऍक्टिव्ह झाला आहे. लोक आपली मतं थेट त्याच वेळेस मांडू लागले. त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा बातमीचे विषय झाल्या, इतका त्याचा प्रभाव आहे. पत्रकारितेतील तंत्रज्ञानात काळानुरूप अनेक बदल झाले, काही बदल स्वीकारणं जुन्या पत्रकारांना कठीणही गेलं. पण पेन, टाइपरायटर नंतर संगणक, कॅमेरा, आता डिजिटल, हा प्रवास खूप वेगाने झाला.स्पर्धेच्या आणि जाहिरातींच्या भाऊगर्दीच्या काळात देखील सत्य आणि तत्व जपणारी, तसेच आपली विश्वासारहता (विश्वासार्हता) कायम ठेवणारी माध्यमे टिकून राहातील अशी खात्री, विश्वास आणि शुभचिंतन करूया
No comments
Post a Comment