नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे करा: अबू आझमी
मुंबई -
औरंगाबाद पाठोपाठ अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पडली आहे. नामांतराचा हा वणवा आता महाराष्ट्रभर पसरताना दिसतोय. नामांतराच्या या मागण्यांवर सपाच्या नेत्यानं भूमिका मांडत महाराष्ट्राचे नाव बदलण्याच आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा भाजपानं उपस्थित केला होता. त्यानंतर अनेक शहरांची नाव बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. यावरून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्येच मतभेद असून, भाजपाकडून सातत्यानं या मुद्द्यावर जोर दिला जात असल्याच दिसत आहे. शहारांची नाव बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे.
सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. शहरांची नाव बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल तर नवी शहरे वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणे योग्य नाही. नामांतर करायचंच असेल तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करण हे आपल्याला शोभत नाही असे आवाहन अबू आझमी यांनी केले आहे.हे आपल्यासारख्याला शोभत नाही महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढ घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचे कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही असे आझमी यांनी म्हटले आहे.

No comments
Post a Comment