संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निष्क्रीय सरकारचे 'श्राद्ध' घालणार
मुंबई -
एक वर्ष होऊनही राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने या निष्क्रीय सरकारचे श्राद्ध घातले जाणार आहे. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असून थेरगाव येथील स्मशान भूमीत शनिवारी (दि.2) सकाळी अकरा वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर त्याबाबत राज्यभर निषेध झाला. विविध पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार तसेच अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहे. रविशंकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. मात्र, हे प्रकरण होऊन तब्बल 365 दिवस झाले; तरी देखील गुन्हा दाखल झाला नाही. पुरोगामी महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असलेल्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व दखल न घेणाऱ्या निष्क्रिय शासनाचे वर्षपुर्ती श्राध्द घालून निषेध करण्यात येणार आहे. याबाबत पुढे दखल न घेतल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा या पत्रकात दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून हे आंदोलन केले जाणार आहे.

No comments
Post a Comment