माझे आणि फडणवीसांचे भांडण; महादेव जानकर यांचा राजकीय गौप्यस्फोट
मुंबई
महादेव जानकर यांनी फडणवीसांसोबत भांडण असल्याचं सांगत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या भेट घेतल्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागले आहे. जानकर भाजपाच्या नेतृत्वाखालील युतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्याचे त्यांनी खंडण केले. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार आहे, असे जानकर म्हणाले.
महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अलिकडेच भेट घेतली होती. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जानकर भाजपाची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चांना त्यांनी स्वतः फेटाळून लावल्या होत्या. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केले होते. भाजपावर आपण नाराज असलो, तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचे नसते.

No comments
Post a Comment