Breaking News

1/breakingnews/recent

23 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

      News24सह्याद्री - भारतात पुढच्या आठवडयात मिळू शकते ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता... ..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

भारतात पुढच्या आठवडयात मिळू शकते ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता

ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी पुढच्या आठवडयात भारतात मान्यता मिळू शकते. यंत्रणांनी मागितलेला अतिरिक्त डाटा स्थानिक उत्पादकांनी सादर केला आहे. या घडामोडीशी संबंधित असलेल्या दोन सूत्रांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. ब्रिटिश औषध उत्पादकाच्या लसीला मान्यता देणारा भारत पहिला देश ठरु शकतो.  
"जगभरात २३ लाख लोकांना मिळाली लस"
अमेरिका, रशिया, युके, चीनसह इतर अनेक देशांना करोनाच्या आपत्कालीन लसीकरणाला मंजुरी मिळाली आहे. अनेकांना ही लस देण्यातही आली आहे. भारतात पुढील महिन्यांत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. जगभरात २३ लाख लोकांना लस मिळाली आहे, भारतीयांना कधी मिळणार? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा
कोरोनाच्या लसीच वितरण देशात येत्या काही दिवसात होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर याबाबतीत बनावट लसींचं वितरण करणारे रॅकेट्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा सायबर सेलने दिला आहे.
लष्करप्रमुख मनोज नरवणे पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर
 पूर्व लडाख सीमेवर चीन विरुद्ध संघर्षाची स्थिती कायम असताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी लडाखचा दौरा केला. त्यांनी एलएसी आणि पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील परिस्थितीचा आढावा घतला. आज सकाळी ८.३० वाजता ते लडाखच्या फॉरवर्ड भागामध्ये पोहोचले. आज संध्याकाळपर्यंत ते दिल्लीला परतण्याची शक्यता आहे.
दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
राज्य मंडळाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ३२.६० टक्के तर बारावीचा निकाल १८.८१ टक्के इतका लागला आहे.  
शेतकरी कायद्याविरोधात राहुल गांधी आक्रमक
शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गुरुवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी पक्षातील अनेक मोठे नेते आणि खासदार त्यांच्यासोबत असतील. राहुल गांधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दोन कोटी स्वाक्षऱ्या असणारं निवेदन सादर करणार आहेत.
अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
महाविकास आघाडीमुळे एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कायमचा घरोबा होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
अमरावती ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. व्यापाऱ्यांने संत्र्याचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यानं राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून आत्महत्या केली. छोट्या भावाच्या आत्महत्येचा दुःखामुळे मोठ्या भावाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यानेही प्राण सोडला. एकाच वेळी घरातील कर्तेधर्ती माणसं गेल्यानं भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंजनगाव सूर्जी तालुक्यातील भुयार कुटंबाला एकाच दिवशी दोन्ही भावंडांना निरोप द्यावा लागला.
पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
२४ डिसेंबरला अहमदाबादमध्ये BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभा
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी म्हणजेच २४ डिसेंबरला अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून….आयपीएलच्या आगामी हंगामाच्या आयोजनापर्यंत निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीनंतर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या संघात एक मैत्रीपूर्ण सामना खेळवला जाईल. यात बीसीसीआयचे इतर अधिकारीही सहभागी होणार आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *