Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट / शिवाजी शिर्के…… जिल्ह्यात राष्ट्रवादीसह कॉंग्रेस- शिवसेना पावरफुल!

No comments

सारिपाट / शिवाजी शिर्के

राज्यात आता शिवसेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे सरकार येणार हे नक्की मानले जात असताना या नव्या सरकारमध्ये जिल्ह्याचे स्थान काय असेल याबाबत चर्चेचे फड रंगात आले आहेत. भाजपात दाखल झालेले हेवीवेट नेते राधाकृष्ण विखे पाटील या संपूर्ण घडामोडीत बाजूला पडले असल्याचे दिसत असताना दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सारा फोकस गेला असून त्यांच्याकडे पुन्हा राज्याच्या मंत्रीमंडळातील दुसर्‍या क्रमांकाची जबाबदारी दिसू शकते. याशिवाय राष्ट्रवादीचे जिल्ह्यात ६ आमदार निवडून आले असताना त्यातील रोहित पवार व संग्राम जगताप यांच्याकडेही संभाव्य मंत्री म्हणून पाहिले जात आहे. शिवसेनेचा जिल्ह्यात सुपडासाफ झालेला असतानाही सेनेला पाठींबा देणारे नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांची वर्णी मंत्रीमंडळात लागण्याची चिन्हे आहेत. पराभूत झालेल्या काही दिग्गजांसह अन्य काही नेत्यांना विधान परिषद आणि महामंडळ मिळेल असा अंदाज असला तरी तीन पक्षांचे मिळून हे सरकार तयार होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याला असे काही मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही.

राज्यातील सत्तासंघर्ष १८ व्या विवशी संपुष्टात आला. भाजपाने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेस आमंत्रीत केले. यानंतर वेगवान हालचाली जशा राज्याच्या पातळीवर झाल्या तशाच त्या जिल्ह्याच्या पातळीवरही! अर्थात जिल्ह्याच्या पातळीवरील या हालचाली राहिल्या त्या चर्चेच्या! भाजपाला बाजूला ठेवून प्रमुख तीन राजकीय पक्ष एकत्र आल्याने सत्तेच्या हव्यासापायी भाजपात गेलेल्यांची मोठी पंचाईत झाली. भाजपात प्रवेश करताना जिल्ह्यातील बहुतेकांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याशीच संपर्क ठेवला होता. आता फडणवीसच सत्तेबाहेर फेकले गेलेे असल्याने ‘आपले काय?’ असा प्रश्‍न अनेकांच्या समोर पडला आहे.

सन १९७७ मध्ये वसंतदादा पाटील यांचे कॉंग्रेस सरकार पाडून शरद पवार यांनी पुलोद सरकारचा प्रयोग केला होता. फोडलेले कॉंग्रेसचे आमदार सोबत घेऊन त्याला जनता पक्ष आणि जनसंघ आमदारांची जोड देत पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. आता हाच प्रयोग पवारांनी पुढाकार घेऊनच सन २०१९ मध्ये केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबईत सिल्वर ओकला आता ठाण मांडून बसलेल्या पवारांनी आपला सारा अनुभव पणाला लावून बिगर भाजप सरकार बनवण्याचा निर्धार यशस्वी केला. सेनेला पाठींबा देताना घाईगडबड न करता कॉंग्रेसला सोबत घेऊनच निर्णय घेण्याची पवारांची खेळी यशस्वी झाली!

बाळासाहेब थोरात राज्यात अन् जिल्ह्यातही झाले ‘हेवीवेट’!
बाजीप्रभूसारखी खिंड लढवित असून ही लढाई आम्ही जिंकणार असल्याचा आत्मविश्‍वास निवडणुकीच्या मैदानात प्रदेशाध्यक्ष म्हणून उतरताना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. खरे तर कार्यकर्त्यांमध्ये बळ येण्यासाठी थोरात असे बोलले असे त्यावेळी बोलले गेले. मुख्यमंत्री व्हायला निघालेल्यांनी आरशासमोर उभे राहावे असा टोमणा थोरातांनी फडणवीस यांना उद्देशून मारताना ‘ते विरोधीपक्ष नेते झालेले दिसतील’ अशी भविष्यवाणी केली होती. ती सत्यात आली. राज्याच्या सध्याच्या घडामोडीत थोरातांची भूमिका निर्णायक झाली आहे. पक्षाचे गत निवडणुकीत ४२ आमदार होते आणि निवडणुकीच्या तोंडावर १७ जण पक्ष सोडून अन्य पक्षात गेले होते. तरीही थोरातांनी कसब पणाला लावले आणि गतवेळी पक्षा २ जागा जिंकत कॉंग्रेसला ४४ आमदार दिले.यामुळे थोरातांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले आहे.

बाळासाहेब राज्यात अन् विखे पाटील शिर्डीत!
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विखे पाटलांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली. प्रतिकुल परिस्थिती असतानाही थोरातांनी पायाला भिंगरी बांधल्यागत काम सुरू केले. त्यावेळी त्यांचे परंपरागत विरोधक असणार्‍या विखे पाटलांनी थोरातांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याच्या हालचाली केल्या. ते कॉंग्रेसचे राज्याचे नव्हे संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा टोला त्यावेळी विखे पाटलांनी थोरात यांना लगावला होता. निकाल बाहेर पडल्यानंतर आज थोरात राज्याच्या राजकारणात वरच्या यादीत जावून बसल्याचे दिसत आहे तर विखे पाटील शिर्डीत आहेत.

सत्यजित तांबे यांनी पडद्याआड हलवली सुत्रे!
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात एका बाजूला निवडणुकीच्या दरम्यान खिंड लढवत असताना दुसर्‍या बाजूला निवडणुकीच्या कालावधीपेक्षाही जास्त गतीने निकालानंतर युवकचे प्रदेशाध्यक्ष असलेले सत्यजित तांबे हे सक्रिय झालेले होते. पडद्याआड राहून कोणत्याही परिस्थितीत राज्यात भाजपाचे सरकार येणार नाही यासाठीची मोर्चेबांधणी करताना कॉंग्रेसच्या दिल्लीस्थित श्रेष्ठींचे मन वळविण्याची मोलाची भूमिका तांबे यांनी बजावली. सेनेला सोबत घेऊन अथवा सेनेला पाठींबा देऊन भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठीची महत्वपूर्ण खेळी सत्यजित तांबे यांनी खेळली आणि कॉंग्रेस श्रेष्ठींचे मतपरिवर्तन करण्यात ते यशस्वी झाले. पडद्याआड राहून मिडीयाचा फारसा फोकस स्वत:वर न घेता तांबे यांनी ‘चाणक्य’ची भूमिका वठवली.

शंकरराव गडाखांना मिळू शकतो लाल दिवा!
जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. विजय औटी आणि अनिल राठोड हे दोघेही अथवा त्यांच्यापैकी कोणीही एकजण आजच्या परिस्थितीत कॅबिनेट मंत्री झालेला दिसला असता. मात्र, दोघांना पराभवास सामोरे जावे लागले. निकाल जाहीर होताच अपक्ष निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी मातोश्री गाठली आणि शिवसेनेला पाठींबा दिला. अभ्यासू आमदार म्हणून त्यांचा लौकीक असून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे ‘मोतोश्री’शी असणारे कौटुंबिक संबंध पाहता गडाख यांना मंत्रीपद मिळू शकते असा कयास बांधला जात आहे.

राष्ट्रवादीचा जिल्ह्याचा नेता कोण?
रोहीत पवार की संग्राम जगताप?
जिल्ह्यावर असणारे विखे पाटलांचे प्रभुत्व मोडीत काढण्याची खेळी आता पुढील काळात राष्ट्रवादी खेळू शकते. त्यासाठी मंत्रीमंडळात सहभागी होताना मोठा खल होऊन जिल्ह्याची जबाबदारी सहापैकी कोणावर येते हे पाहावे लागणार आहे. आक्रमक विखे पाटलांना रोखण्याची क्षमता त्यासाठी तपासली जाऊ शकते. दुसर्‍यांदा संधी मिळालेले संग्राम जगताप यांचे नाव सध्या पुढे आहे. मात्र, दुसरीकडे पवार परिवाराबद्दल विखे पाटील जाहीरपणे जे काही बोलत आले आहेत ते पाहता रोहित पवार यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये.

पिचड, पाचपुते राहणार पवारांच्या हिटलिस्टवर!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणारे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि मागील निवडणुकीत पक्षाला रामराम ठोकणारे बबनराव पाचपुते हे पवारांच्या हिटलिस्टवर दिसणार यात शंका नाही. पिचड यांना पराभवास सामोरे लागले आणि पिचड कसे पडतील याची पुरेपूर काळजी पवारांनी घेतली. मागील वेळी हाच दणका पवारांनी बबनराव पाचपुतेंना दिला होता. यावेळी पाचपुते निसटत्या मतांनी विजयी झाले. पिचड यांचे पक्ष सोडणे पवारांना धक्कादायक राहिले. पिचडांना त्यांची जागा पवारांनी दाखवून दिली असताना पाचपुतेंच्या बाबत पवारांची भूमिका काय असणार हेही महत्वाचे ठरणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *