Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट / शिवाजी शिर्के…. एसपी साहेब, कायद्याचा धाक संपलाय का?

No comments

सारिपाट / शिवाजी शिर्के

थिअरी आणि प्रॅक्टीकल यात मोठा फरक असतो हे पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नगरकरांनी कधीकाळी प्रचंड गुंडगिरी आणि त्याआड चालणारी दशहत अनुभवली! तीही याची देही याची डोळा! कृष्णप्रकाश नावाचा ढाण्या वाघ आला! नुसता आला नाही तर त्याने हातातील दंडुक्याचा असा काही वापर केला की तथाकथीत गुंड आणि त्या गुंडांना पोसणारेही गायब झाले. काही जन्मठेपेच्या शिक्षेत तर काही कोर्टकचेर्‍यांच्या झेंगाटात! करिमभाई हुंडेकरी हे नगरशहरातील प्रतिष्ठित नाव! यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कामात त्यांचा कायमच हिरीरीने सहभाग ठरलेला! करिमभाईंच्या अपहरणाची बातमी बाहेर येताच धक्का बसला. नगर शहरात नक्की काय चालू आहे? भल्या पहाटे नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडणारे करिमभाई अपहरणकर्त्यांनी उचलून नेले! तुमचे- आमचे काय? एसपी साहेब, तुमच्याकडून नगरकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत! त्यातील किती पुर्‍या झाल्या यावर स्वतंत्र लिहूच! पण आज करिमभाईंच्या अपहरण प्रकरणाने नगर शहरातील सामान्य जनतेमध्ये, उद्योजकांमध्ये प्रचंड असुरक्षेचे वातावरण तयार झाले आहे. असे असताना आपण तातडीने या अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याची गरज आहे! त्याहीपेक्षा नगर शहरात आणि जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे की नाही हेही दाखवून देण्याची आवश्यकता आहे आणि तीही कृतीतून!

एसपी साहेब, नगरकर सोशीक झाले असले तरी त्यांच्या सोशिकतेचा अंत पाहू नका! करिमभाईंची घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. कोणत्या कारणाने त्यांचे अपहरण झाले आणि अपहरणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत याचा शोध आणि उलगडा नक्कीच होईल. पोलिसही त्याच्या खोलात जातील. पण नगरकर गाढ झोपेत असताना करिमभाई सारख्या उद्योजक- सामाजिक कार्यकर्त्याला दमदाटी करीत- पिस्तुलाचा धाक दाखवित उचलून नेले जात असेल तर आता यापुढे कोणीही एकट्याने बाहेर पडू नये, असेच काहीसे म्हणावे लागेल. एसपी साहेब, संदीप खरे नावाच्या कवीची कविता आठवतेय का तुम्हाला! संदीप खरे हा कवि त्याच्या कवितेत म्हणतो, ‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवला नाही’ या कवितेसारखं नगरकरांचं झालं असलं तरी आजच्या घटनेमुळे नगरकरांच्या संयमाचा बांध कोणत्याही क्षणी फुटू शकतो आणि त्यावेळी परिस्थिती तुमच्या अवाक्याबाहेर गेलेली असेल आणि त्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल!

नगरकरांच्या मनातील मुर्दाडपणा नाहिसा व्हावा यासाठी आम्ही (नगर सह्याद्री) ही खमकी भूमिका कायम घेत राहिलो आणि घेत राहणार! एसपी ईशू सिंधू यांच्यासारखा उमदा व खमका आयपीएस अधिकारी हातात काठी घेऊन उतरला असताना त्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना पाठबळ देण्याची भूमिका आतापर्यंत तरी नगरकरांनी घेतलीय! नगरकरांमधील मुर्दाडपणा संपावा आणि नवा सुर्योदय या जिल्ह्यात व्हावा यासाठी आम्ही ‘नगर सह्याद्री’च्या माध्यमातून सातत्याने ‘सारिपाट’ मांडत आलोत! विश्‍वास नांगरे पाटील, कृष्णप्रकाश यांच्यासारखा धडाकेबाज, निधड्या छातीचा ढाण्या वाघ नगरकरांना ईशू सिंधू यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसावा अशी अपेक्षा या घटनेच्या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे. खरे तर नगरचे राजकारण, समाजकारण, उद्योग, शिक्षण, सहकारातील वेगवेगळ्या अपप्रवृत्तींनी ढवळून निघाले आहे.

नगर शहरात सो कॉल्ड व्हाईट कॉलर गुंडा लोकप्रतिनिधी हे त्या-त्या संस्थानचा संस्थानिक असून त्याचे पंटर या संस्थानाचे सेनापती सुभेदार आणि तुम्ही आम्ही म्हणजे लाचार प्रजा. ही सारी परिस्थिती तयार झालीय ती नगरकरांच्या अबोलपनामुळे, सोशिकतेमुळे! हे बदलवायला कोण सुपरमॅन किंवा देवादिक येणार नसून त्यासाठी आवश्यकता आहे ठाम निश्‍चयाने मुठ आवळण्याची. अधिकारी येतील आणि जातील! पण नगरकरांच्या मानसिकतेचे काय? सजग नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदार्‍या आहेत. हक्क कळतात पण कर्तव्याचे काय? विश्‍वास नांगरे पाटील आले! त्यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक झाले! त्यांची बदली झाली! पुढे काही वर्षे मरगळ आली. मग कृष्णप्रकाश यांच्यासारखा निधड्या छातीचा उमदा अधिकारी आणि नगरमधील गुंडगिरीचा बंदोबस्त झाला! तरुणाई जाम फिदा झाली आणि तितकीच नगरची सामान्य जनताही! कानात बाळ्या घालून फिरणारे कान कायमचे मोकळे दिसू लागले! झिपर्‍या केसांची टपोरी पोरं सलूनमध्ये जाऊन केस कापू लागली! बुलेटवरच्या सफारीतून होणारी छेडछाड बंद झाली! मुली- महिला रस्त्याने मोकळा श्‍वास घेऊ लागल्या! नगरकरांना खूपच हायसं वाटायचं! कृष्णप्रकाश यांची बदली झाल्यानंतर नगरकरांनी त्यांना सहृदयी निरोप दिला. पुढे काय? पुन्हा मागचेच दिवस. सिंधू साहेब, आता तरी तुमच्यातील खमका अधिकारी नगरकरांना दिसावा! तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. खाकीला बदनाम करणारे काही बदमाश तुम्ही खड्यासारखे हेरले आणि त्यांना बाजूला केले. आता जरा बाहेर पडण्याची आणि या शहरात कायदा आहे आणि कायद्याचा धाक आहे हे दाखवून देण्याची गरज आहे. आजच्या अपहरणाच्या घटनेनंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील संस्थाने खालसा झालीत का, असा प्रश्‍न पडतो आहे. तिसर्‍या इयत्तेत इतिहासाच्या पुस्तकातील संस्थाने खालसाचे धडे सर्वांनाच प्रेरणा देऊन जायची. आज वस्तुस्थिती नक्की काय? संस्थाने खालसा झालेलीच नाहीत! आपल्या प्रत्येक वॉर्डात, गावागावात आणि परिसरात ही संस्थाने आजही जीवंत असल्याचे करिमभाईंच्या अपहरणातून स्पष्ट झाले आहे.

नगरकारांसाठी बाजीराव सिंघम ठरलेल्या कृष्णप्रकाश यांनी गुंडगिरीला हात घातला. आपण सारे त्यांच्या या कामगिरीने सुखावलो, मात्र सिंघम पदोन्नतीने बदलून गेला. मागच्या काही वर्षात काय झाले? जिल्ह्याला तरुण आणि थेट आयपीएस अधिकारीच पाहिजे अशी भावना व्यक्त होऊ लागली. नगरकरांचा ‘बाजीराव सिंघम’चा शोध चालू असतानाच ईशू सिंधू यांची नियुक्ती झाली. कृष्णप्रकाश यांच्यानंतरच्या मधल्या कालावधीत ‘सिंघम’ चित्रपटातील जयकांत शिक्रे सारख्या प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले असताना एसपी म्हणून ईशू सिंधू साहेब तुमची नियुक्ती झाली. जळगावमधील सुरेश जैन या मोठ्या धेंडाला आपण ठोकलेल्या बेड्या आणि त्यातून तुमच्यातील निडरपणा नगरकरांना भावला. आता उद्योजक करिमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणामुळे सामान्य नगरकरांमध्ये देखील दहशत आणि भितीचे वातावरण तयार झाले आहे. ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडावे की नाही अशी भिती नगरकरांमध्ये निर्माण झाली आहे. ही भिती कमी करण्यासाठीची पाऊल जिल्ह्यातील पोलिसांचे ‘कॅप्टन’ या नात्याने आपल्याला करावे लागणार आहे आणि ते आपण कराल अशी अपेक्षा आहे. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून करिमभाई सुखरुप बाहेर पडतील आणि त्यासाठी पोलिसही प्रयत्नशिल राहतील यात शंका नाही. आता पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. नगरकरांच्या मनातील दहशत आणि भिती कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे इतकेच! नसता… जनक्षोभ अटळ आहे!

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *