Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट / शिवाजी शिर्के….. जिरविण्याच्या नादात ‘त्यांनी’ गमावलं अन् हिसका दाखवत ‘यांनी’ कमावलं!

No comments

सारिपाट / शिवाजी शिर्के

विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा समोर आलाय! कोण किती मतांनी जिंकलं आणि हरलं यापेक्षा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे ती कोणाची कोणी जिरवली याचीच! या जिरवी जिरवीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते भाजपाचे! सारा जिल्हाच हातात आलाय अशा अविर्भावात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा नगरने फोडला. महाजनादेश मागताना नगरमध्ये आलेल्या फडणवीस यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांना थेेट रथावर घेतले आणि त्याच राठोडांना भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी थेट पुन्हा चितळे रस्त्यावरील कार्यालयात बसविले! राठोडांना घरी बसविणार्‍यांनीच लोकसभेत नगरमधून ५० हजारापेक्षा जास्त मताधिक्य दिले होते! शिवसेनेचा सुफडा साफ राष्ट्रवादीने नव्हे तर भाजपाने केला! राठोड- औटी यांच्या विरोधात कोणी कसे व कोणाच्या आदेशाने काम केले हे सर्वश्रूत! कॉंग्रेसच्या थोरातांनी संयमी भूमिका घेत श्रीरामपूर ही कोणाची जहागीरी नाही हे कृतीतून दाखवून दिले. कायमच राष्ट्रवादीच्या विरोधात ओरडणार्‍या विखेंनी १२-० अशी दर्पोक्तीची भाषा केली असताना जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले आणि नेवासामधून राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर गडाख निवडून आले. जिरविण्याच्या नादात सारं काही गमावून बसलेल्यांना पवार अन् थोरात या दोघांनी मिळून हिसका दाखविला इतकेच!

स्पर्धक संपविण्याच्या नादात भाजपा जिंकून हरली!
भाजपाच्या गत विधानसभेत शिर्डी, कोपरगाव, राहुरी, शेवगाव, नेवासा व कर्जत अशा सहा व शेवटच्या टप्प्यात अकोल्याचे पिचड भाजपात असे मिळून सात जागा होत्या. कालच्या निकालात ४ जागा कमी झाल्या अन् तीन पदरात पडल्या. त्यातील श्रीगोंद्याची जागा काठावरची! शेवगावची राजळेंची जागा मुंडेंच्या कृपेने! शिर्डीची जागा विखेंचे व्यक्तीगत यश! याचाच अर्थ भाजपाला जिल्ह्यात फक्त आणि फक्त सूज आली होती आणि ही सूज मतदारांनी उतरवून टाकली. सत्तेची मस्ती नडली की आयाराम नडले याचे आत्मचिंतन होणार असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की भाजपाला जिल्ह्यातील मतदारांनी साफ नाकारले आहे. राजळेंच्या यशात मुंडेंचा म्हणजेच पर्यायाने वंजारी समाजाचा वाटा आहे. हा वाटा मुंडेंच्या आशीर्वादाने मिळालेला. राजळेंच्या विजयात जिल्ह्यातील एकही नेता वाटेकरी होऊ शकत नाही. वाटा द्यायचाच ठरला तर तो फक्त पंकजा मुंडे यांनाच! श्रीगोंद्यात शेवटच्या क्षणी काष्टीकर बबनरावांच्या मदतीला धावले नसते घनश्यामअण्णा मुंबईत गेले असते. यामुळेच या दोन्ही जागा त्यांच्या- त्यांच्या व्यक्तीगत पातळीवर जिंकल्या गेल्यात! शिर्डीत विखे पाटलांचे स्वतंत्र संघटन आहे. येथे विखे पाटील हाच राजकीय पक्ष असल्याने भाजपाचे हे यश नाहीच! एकूणच विधानसभा निवडणुकीत भाजपा जिल्ह्यात सपशेल अपयशी ठरला असून जनतेने नकारात्मक कौल दिला हे मान्यच करावे लागेल.

जिरवाजिरवीचं ‘टायमिंग’ चुकले अन् सहा विकेट गमावल्या!
निवडणुकीच्या कालावधीत विखे पाटलांकडून जिल्ह्यातील घड्याळाची बॅटरीच काढून टाकलेली दिसेल अशी दर्पोक्तीची भाषा वापरली गेली अन् प्रत्यक्षात त्यांच्या समर्थकांनी याच घड्याळाला चावी देण्याचे काम केले. ही चावी इतकी भक्कमपणे बसली की डिस्चार्ज होऊ लागलेली घड्याळाची बॅटरी फुलचार्ज झाली अन् पहिल्या झटक्यात राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड या भाजपाच्या चौघांची अन् शिवसेनेच्या विजय औटी, अनिल राठोड यांची विकेट पडली. जिल्ह्यात आम्ही म्हणू तेच अंतिम आणि आमच्याशिवाय अन्य कोणीच नाही हे सिद्ध करण्याचे टायमींग यावेळी चुकले आणि त्यातूनच महायुतीच्या जिल्ह्यातील सहा जागा गेल्या हे मान्यच करावे लागेल.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *