27 मे सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कुठल्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार
वारकरी संप्रदायात अत्यंत महत्वाचा मानला जाणारा आषाढी पायी पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की गेल्यावर्षीप्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या जाणार याकडे राज्याच्या लक्ष लागलंय.
2. महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार
ओडीशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाला फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
3. विद्यार्थ्यांना पुस्तकं कधी मिळणार?
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होते. मात्र, यावर्षी मे महिना संपत आलाय, तरीही अद्याप महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे पाठ्यपुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ई-पाठ्यपुस्तके पी-डी-एफ स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध याही वर्षी देण्यात आली आहे.
4. संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही भेटायला तयार नसतील तर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले. राज्यात दौरे करुन किंवा आंदोलन करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही जाधव यांनी म्हटले.
5. इन्शुरन्स तौक्ते चक्रीवादळाच्या एक दिवस आधी संपला,
तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या कोकणवासियांना आता मदत मिळण्यातही अनेक अडचणी येत आहेत. शासनाकडून मिळणारी मदत सामान्यांपर्यंत कितपत पोहोचते, हा विषय संशोधनाचा आहे. कारण, या बागायतदारांनी काढलेल्या विम्याची मुदत तौक्ते चक्रीवादळाच्या एक दिवस आधी संपुष्टात आली.
6. शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या भरतीला लवकरच सुरुवात
भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या ऑगस्ट महिन्यांच्या अखेरीस कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून या प्लांटमधून जास्तीत जास्त लसीचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे
7. लॉकडाउनसंबंधी विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाउन १ जून रोजी संपत असून तो पुन्हा वाढवला जाणार की उठवला जाणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सध्या राज्य सरकारकडून तयारी सुरु असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
8. पदोन्नती आरक्षण रद्द : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ठरणार वादळी?
पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चांगलीच गाजणार असल्याची शक्यता आहे.
9. जेफ बेझोस 5 जुलैला सोडणार अॅमेझॉनचे सीईओ पद
येत्या पाच जुलैला सीईओ पदाचा राजीनामा देणार आहे, असे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी म्हटले आहे. अॅमेझॉनला इंटरनेट बुक स्टोअर ते ऑनलाइन शॉपिंग कंपनी बनवणाऱ्या जेफ बेझोस यांनी बुधवारी सांगितले की, अँडी जेसी हे आता 5 जुलैला अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील.
10. बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना कधी पत्र लिहिणार?
पोटावरील शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्यानंतर आता पवारांनी लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.
No comments
Post a Comment