Breaking News

1/breakingnews/recent

23 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री शिक्षकाने दिले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये





TOP HEADLINES


1. भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा माफीनामा, पदही गमावलं!
शनिवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये एक जिल्हाधिकारी भररस्त्यावर एका तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी यावर चर्चा सुरु केल्यानंतर त्यातलं सत्य समोर आलं. व्हिडिओमध्ये तरुणाला कानशिलात लगावणारे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा आहेत. या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे. 

2. दिलासादायक! करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील दररोज साडेचार लाखांच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आता घसरत असल्याचं दिसून येत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे. पण देशातील मृतांची दररोजची सरासरी मात्र खाली येताना दिसत असून, देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे तीन हजार ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे शुक्रवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे.

3. “भाजपात प्रवेश करून चूक केली, दीदीशिवाय नाही राहू शकत”
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आटोपून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं असलं, तरी राजकीय घडामोडींचा सपाट सुरूच आहे. सीबीआयच्या कारवाईने कोलकात्यातील राजकारण पेटलं होतं. त्याचे लोळ विझत नाही, तोच आता नवीन नाट्यमय घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या पत्राची सध्या बंगालमध्ये चर्चा होत आहे. 

4. भारतीयांचा परदेशप्रवास अवघड
करोना लशींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ मेनंतरही उठण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नाही. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

5. आपत्ती निवारण पथकाची सांगलीत कृष्णेत प्रात्यक्षिके
सांगली येथे संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती निवारण पथकाचे मंगळवारी कृष्णा नदीमध्ये प्रात्यक्षिक करण्यात आले.यावेळी महापुराच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

6. नेपाळची संसद बरखास्त
नेपाळच्या अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी संसद बरखास्त केली असून नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. १२ व १९ नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत.  दरम्यान के.पी. शर्मा  ओली व विद्यादेवी भंडारी यांनी राज्यघटनेचे उल्लंघन करून संसद बरखास्त केली.

7. ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंना संपूर्ण सहकार्याचे पंतप्रधानांचे आदेश!
भारतातील करोना रुग्णसंख्या वाढत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. भारताचे विविध क्रीडा प्रकारांतील जवळपास १०० खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. तलवारबाजीमध्ये ऑलिम्पिक स्थान निश्चित करणारी भवानी देवी आणि अनुभवी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी सध्याच्या काळातही सातत्याने सहकार्य केल्यामुळे शासन आणि क्रीडा मंत्रालयाचे शुक्रवारी आभार मानले. 

8. तराफा अपघातातील मृतांची संख्या ६६
तराफा अपघातात मृतांची संख्या शनिवारी ६६ वर पोहोचली. त्यापैकी १८ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. ‘पी ३०५‘ तराफा( बार्ज) समुदात बुडाल्यानंतर नौदलाने बचावकार्य, बेपत्ता असलेल्यांसाठी शोधमोहिम सुरू केली. शनिवारी संध्याकाळपर्यंत नौदलाने ६६ मृतदेह शोधले. पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार संध्याकाळपर्यंत नौदलाने ६१ मृतदेह  मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.

9. गवताच्या नव्या प्रजातीचा आंबोलीमध्ये शोध
समृद्ध जैवविविधता असलेल्या आंबोलीमध्ये गवताच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पावसाळी ओढ्यांमध्ये आणि आंबोली गावातील भातखाचरांमध्ये ही प्रजाती आढळून आली असून, या प्रजातीचे ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असे नामकरण करण्यात आले आहे. आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मंदार दातार, डॉ. शुभदा ताम्हनकर, डॉ. रितेश कुमार चौधरी आणि सारंग बोकील यांचा या संशोधनात सहभाग आहे. 

10. औरंगाबादमध्ये बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था
करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने तयारी म्हणून विविध रुग्णालयात केवळ बालकांसाठी ७३६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ प्राणवायू सुविधेच्या खाटा असणार आहेत. त्यासोबतच एमजीएम आणि मेल्ट्रॉनमधील बाल कोविड केंद्रातही मनपाचे डॉक्टर कार्यरत असतील, असे  महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *