जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य कसे आहेत फायदेशीर

मुंबई -
मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्स आरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेल्या धान्याला अंकुरित धान्य असेही म्हणतात. अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं. म्हणून आहारात मोड आलेल्या धान्याचा जरूर समावेश करा. नॅचरोपॅथीमध्ये अकुंरित धान्य एखाद्या औषधाप्रमाणे वापरण्यात येतात. तज्ञांच्या मते सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्ये अथवा अकुंरित धान्य खाल्याने शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. मात्र अनेकांच्या मनात मोड आलेल्या धान्य खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. यासाठी स्प्राऊट अथवा अकुंरित धान्याबद्दल ही माहिती जरूर वाचा.
१. अंकुरित धान्य म्हणजे काय
अकुंर येण्यासाठी धान्य अथवा कडधान्याला काही तास पाण्यात भिजवावे लागते. सहा ते सात तासांनी ही तृण अथवा कडधान्यं भिजून फुगतात. भिजवलेलं धान्य एका स्वच्छ कापडामध्ये रात्रभर बांधून ठेवल्यास त्या धान्यांला मोड फुटतात. अशा प्रकारच्या धान्यांना अंकुरीत अथवा मोड आलेलं धान्य असं म्हणतात. मोड आलेल्या धान्यांमधील स्टार्च साधारणपणे ग्लुकोज, फ्रॅक्टोज आणि माल्टोज शर्करेत रूपांतरीत होते. ज्यामुळे अकुंरित धान्य चवीला स्वादिष्ट आणि पचायला हलकी होतात. यासाठीच अख्या धान्यापेक्षा मोड आलेली धान्य आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात.
२. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कोणती पोषक तत्त्व असतात
अकुंरित धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि के भरपूर प्रमाणात असते. या शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि लोह असतं. यासोबतच मोड आलेल्या धान्यांमध्ये भरपूर फायबर, फॉलेट, ओमेगा 3 फॅटी अॅसिडदेखील असतात. अंकुरित धान्य नियमित खाण्याने तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात.
३. कोणत्या प्रकारची मोड आलेली धान्ये खावीत
अंकुरित धान्यांमध्ये अनेक धान्यांचा समावेश करता येऊ शकतो. जसं की यामध्ये तुम्ही अनेक प्रकारची तृणधान्य, कडधान्य, विविध डाळी, बिया, फळांच्या बियां यांचा समावेश करू शकता. मोड आलेल्या धान्याला तुम्ही कच्चे अथवा शिजवून खाऊ शकता. अंकुरित धान्यापासून तयार केलेलं सॅलेड अवश्य खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतील.
४. अकुंरित धान्य तयार करण्याची योग्य प्रकिया कोणती
आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाच ते सहा तास एखादे धान्य भिजवून मग ते रात्रभर एका स्वच्छ ओल्या कापडात गुंडाळून ठेवू शकता. ओल्या कापडाच्या उबदारपणामुळे धान्याला मोड फुटतात. कडधान्य भिजवण्यापूर्वी आधी ते चार ते पाचवेळा स्वच्छ धुवून घ्या. रात्रभरात धान्याला मोड फुटू शकतात. हिवाळ्यात मोड उगवण्यास वेळ लागतो. मात्र उन्हाळ्यात हिच प्रक्रिया अगदी जलद पद्धतीने होते. आजकाल धान्याला मोड आणण्यासाठी काही भांडी तयार करण्यात आली आहेत. बाजारात ही भांडी सहज उपलब्ध असतात. तुम्ही या भांड्याच्या मदतीनेदेखील धान्याला मोड आणू शकता.
५. अकुंरित धान्याचे फायदे
अकुंरित धान्य खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारांना दूर ठेवता येते. यासाठीच जाणून घ्या अकुंरित धान्याचे आरोग्यावर होणारे फायदे.
६. वजन कमी करण्यासाठी
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारात अंकुरित धान्यांचा समावेश अवश्य करा. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. ज्यामुळे तुमचं लगेच पोट भरतं आणि वारंवार भुक लागत नाही. वारंवार भुक न लागल्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज कमी प्रमाणात जातात. शिवाय अंकुरित धान्यामधील पोषक घटकांमुळे तुमची भुक लवकर भागते आणि वजन कमी होण्यास मदतच होते.
७. स्टॅमिना वाढतो
शरीरातील स्टॅमिना वाढणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ मिळणं. स्टॅमिना वाढल्यामुळे तुम्ही न थकता दिवसभर कामं करू शकता. अंकुरित धान्यांमुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यासाठीच सकाळी नाश्ता करताना त्यात अंकुरित धान्याचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल.
८. डोळ्यांचे आरोग्य सुधारते
डोळे निरोगी राहण्यासाठी अंकुरित धान्य लाभदायक ठरू शकते. कारण यामुळे तुमची दृष्टी सुधारते शिवाय डोळ्यांचे विकार होत नाहीत.
९. पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी अंकुरित धान्य अवश्य खा. कारण धान्याला मोड आल्यामुळे त्यामधील कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स आणखी वाढतात. पाचक पदार्थांची वाढ झाल्यामुळे मोड आलेली धान्य शरीरासाठी उत्तम ठरतात.
१०. रोगप्रतिकार शक्ती वाढते
नियमित अंकुरित धान्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि शरीरा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला आजारपणांचा सामना कमी प्रमाणात करावे लागते.
११. मधुमेहींसाठी उत्तम
जर तुम्ही मधुमेही असाल तर लगेच अंकुरित धान्याचे सेवन जरूर करा. कारण काही संशोधनानुसार अकुंरित धान्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तज्ञांच्या मते मधुमेंहींनी मोड आलेल्या मेथी दाण्यांचा आहारात वापर केल्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
१२. केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
अकुंरित धान्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तुमच्या केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असतात. कारण अंकुरित धान्य खाण्याने रक्त शुद्ध होते. रक्त शुद्ध झाल्याचा परिणाम तुमची त्वचा नितळ आणि चमकदार होते. यामुळे केसदेखील घनदाट आणि मजबूत होतात.
१३. ह्रदयरोगांपासून बचाव
अंकुरित धान्याचे सेवन केल्यामुळे ह्रदयरोगाची समस्या दूर होते. यासाठीच रोज तुमच्या आहारात एका तरी अंकुरित धान्याचा समावेश करा. अंकुरित धान्यामुळे ह्रदयविकार येण्याचा धोका कमी प्रमाणात होतो. अंकुरित धान्यामधील पोषततत्त्व रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. ज्यामुळे ह्रदयरोगापासून तुमचा बचाव होतो.
१४. कर्करोग होण्याचा धोका कमी होतो
अंकुरित धान्यामधील अॅंटी ऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडीकल्स नष्ट करतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
१५. गरोदर महिलांसाठी उपयुक्त
गरोदर महिलांनी अंकुरित धान्याचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. अंकुरित धान्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. बाळाचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारण्यासाठी नियमित अंकुरित धान्य खा.
No comments
Post a Comment