’24 तासांत प्रसारण थांबवा’, ‘बॉम्बे बेगम’ वेब सीरीजला कंटेंटविषयी पाठवली नोटीस ! काय आहे प्रकरण..

मुंबई । नगर सहयाद्री -
बॉलिवूडनंतर आता सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवत आहे. तांडव वेब सीरीज वादानंतर सरकार या प्रकरणात वेगाने हालचाल करताना दिसत आहे. अॅमेझॉन प्राईमनंतर आता नेटफ्लिक्स सारख्या आणखी प्लॅटफॉर्मवर कठोर लक्ष ठेवताना सरकार दिसत आहे. यादरम्यान आता चाईल्ड कमिशनने नेटिफ्लिक्सला त्यांच्या बॉम्बे बेगम या वेब सीरीजच्या कंटेंटविषयी नोटीस पाठवली आहे. तसेच, त्यांना पुढील 24 तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. नेटफ्लिक्सची ही वेब सीरीज 8 मार्च रोजी प्रदर्शित झाली होती. ज्यानंतर आता बाल आयोगाने हे कठोर पाऊल उचलले आहे. बाल आयोगाकडे आलेल्या तक्रारी नुसार या वेब सीरीजमध्ये 13 वर्षाची लहान मुलगी ड्रग्ज घेत असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. यासह शालेय मुलांचे अतिशय चुकीचे चित्रण केले गेले आहे, यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. यापूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर त्यांच्या तांडव या वेब सीरीजसाठी कारवाई केली गेली होती. तांडव’ बद्दल बरीच गोंधळ उडाला होता.
यानंतर अॅमेझॉनच्या वतीने या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. नेटफ्लिक्स सीरीज ‘बॉम्बे बेगम’ ही अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केली आहे. या सीरीजमध्ये पाच वेगवेगळ्या महिलांची कहाणी दर्शवली गेली आहे. अभिनेत्री पूजा भट्टने या वेब सीरीजमधून कमबॅक केले आहे. या वेब सीरीजमधील पूजा भट्ट व्यतिरिक्त सुहाना गोस्वामी, प्लाबिता बोर-ठाकूर, अधिया आनंद यांच्यासह अनेक मोठे चेहरे आहेत. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी एनसीपीसीआर ही सर्वोच्च संस्था आहे. वेब सीरीजचे प्रसारण थांबवण्यासाठी एनसीपीसीआरने नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे. एनसीपीसीआरने ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला 24 तासात सविस्तर कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आयोग असे म्हणतो की, नेटफ्लिक्स तसे न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. या मालिकेत अल्पवयीन मुलांचे अनैतिक लैंगिक संबंध आणि त्यांनी मादक पदार्थांचे सेवन केल्याचे दाखवण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या मालिकेतल्या मुलांच्या कथित अनुचित चित्रणावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, अशा सामग्रीमुळे केवळ तरुणांच्या मनावर परिणाम होणार नाही तर, यामुळे मुलांचे शोषण देखील होऊ शकते.
No comments
Post a Comment