News24सह्याद्री - “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही
राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
2. “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”
हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय.
3. खरंच महाराष्ट्रात १ मार्चपासून लॉकडाउन लागणार आहे का?
महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारीला राज्यातील जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. म्हणजेच १ मार्चला लॉकडाउन लावायचा की नाही यासंबंधी उद्धव ठाकरे निर्णय़ जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर लॉकडाउनची अफवा सुरु झाली आहे.
4. शिवसेनेची मोदींवर बोचरी टीका
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यावरुन विरोधक टीका करत असताना शिवसेनेनेही यावरुन नाराजी जाहीर केली आहे. भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव बदलून मोदींचं नाव देण्यावरुन शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
5. केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ
केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
6. पूजाची शेवटची फेसबूक पोस्ट आता चर्चेत
पूजा चव्हाणनं मंत्र्यासोबतच्या कथित संबंधात आत्महत्या केल्याची जोरात चर्चा असतानाच तिच्या शेवटच्या फेसबूक पोस्टचीही आता तेवढीत चर्चा होते आहे. ही चर्चा विशेषत: साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रात होतेय. मराठीच्या सार्वकालिन महान कादंबरीकाराबद्दल जी भाषा पूजा चव्हाणनं वापरली आहे त्यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.
7. विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच
कोरोनामुळे विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे.
8. यंदाच्या मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच आता 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले असतांनाच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने संमेलनावर अनिश्चितेचे सावट आहे.
9. शेअर मार्केट एक हजार अंकांनी कोसळलं
जागतिक शेअर मार्केटमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव खाली आल्यानंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची घसरण पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या शेअर निर्देशांक 49,950.75 अंकांवर घसरला होता. नंतर त्यात काही सुधारणा होऊन तो पुन्हा 50,112.10 वर पोहचला. निफ्टीही 270.40 अंकांनी घसरल्याने ती 14,826.95 अंकावर पोहोचली.
10. पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या २४ लोकल फेऱ्यालवकरच
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी ते विरार धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून मार्चपासून या मार्गावर १५ डब्यांच्या २४ फेऱ्याचालवण्याचा विचार होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली.
No comments
Post a Comment