19 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - संभाजीनगर फलक असलेली बस फोडणाऱ्या एमआयएमच्या ११ जणांवर गुन्हा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर कर्नाटकच्या नेत्यांचा आणि संघटनांचा थयथयाट सुरु
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कन्नड संघटनांच्या सदस्यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान करून निषेध व्यक्त घेतला आहे. भरीस भर म्हणजे बेळगावमधील काही राजकारणी नेते मंडळींनी देखील उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
3. BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस
संकटांवर मात करताना टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. अॅडलेडवरील '३६'च्या आकड्यानंतर टीम इंडिया असा कमबॅक करेल, याचा स्वप्नातही ऑस्ट्रेलियन संघानं विचार केला नव्हता. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल, रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी शानदार खेळ केला. भारतानं ३ विकेट राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाच्या या विजयानंतर बीसीसीआयनंही संघाचं कौतुक केलं आहे. तसंच संघाला ५ कोटी रूपयांचा विशेष बोनसही जाहीर केला आहे.
4. मुंबईच्या महापौरांनी कृष्णकुंजवर घेतली राज ठाकरेंची भेट
शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागवल्या. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी सायंकाळी रोजी सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी 10.30 वाजता राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
5. संभाजीनगर फलक असलेली बस फोडणाऱ्या एमआयएमच्या ११ जणांवर गुन्हा
वैजापूर बसडेपोमध्ये संभाजीनगर नावाचे फलक असलेली उभी बस फोडल्या प्रकरणी एमआयएमच्या तालुका अध्यक्षासह ११ जनांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार आरोपीच्या मुसक्या अवळण्यात वैजापूर पोलिसांना यश आले आहे. अखिल कुरेशी असे एमआयएम तालुका अध्यक्षचे नाव आहे. त्यासह अकरा जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख कलीम शेख अब्दुल, शेख अरबाज,जुनेद सय्यद जमील सय्यद, शेख राजू शेख मजीद. अशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
6. नागपूर शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला गती
शहरातील सर्व झोन अंतर्गत येणारे रस्ते व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानंतर शहरात कारवाईला गती मिळाली आहे. सोमवारी शहरातील दहाही झोनमध्ये विविध भागात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.
7. भारताला पहिली स्वदेशील लस देणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनंच ही लस तयार केली आहे
कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्यात भारतानं आपली कंबर चांगलीच कसली आहे. भारताची आणखी एक स्वदेशी लस तयार झाली आहे. आधी इंजेक्शन आणि आता नाकावाटेही दिली जाणारी लस तयार करण्यात आली आहे. भारताला पहिली स्वदेशील लस देणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनंच ही लस तयार केली आहे.
8. JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
JEE मेन्स परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. JEE मेन्स परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांना NIT, IIT, SPA आणि CFIT सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.
9. भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांचा टोला
शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचे वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, असं म्हणत भाजपा प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी असा टोला लगावला आहे.
10. केंद्रानं व्हॉट्सअॅपला सुनावलं
इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने ४ जानेवारी रोजी आपल्या नव्या सेवा शर्ती (टर्म ऑफ सर्व्हिस) जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. ८ फेब्रुवारीपासून या सेवा शर्ती लागू केल्या जाणाऱ्या होत्या. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हॉट्सअॅपने अंमलबजावणी पुढे ढकलली. मात्र, आता केंद्रानं व्हॉट्सअॅपच्या भारतातील सीईओंना नवीन प्राइव्हसी पॉलिसीवरून कठोर शब्दात सुनावलं आहे.
No comments
Post a Comment