Breaking News

1/breakingnews/recent

12 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - भारताच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार - रामेश्वर शर्मा...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

१. विषारी दारु पिल्याने मोरेना जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू  
विषारी दारु पिल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात घडली आहे.मोरेना जिल्ह्यातील दोन गावांमध्ये या घटना घडल्या असून पहावली आणि मनिपूर अशी या गावांची नाव आहेत. पहावलीतील तीन, तर मनिपूरमध्ये सात लोक मरण पावले आहेत. सात जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्या व्यक्तीला ग्वालियरला हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली.  

२.भारताच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार -  रामेश्वर शर्मा 
महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली, असं विधान मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आणि भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे. शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी हे वक्तव्य केलं. शर्मा यांचा हा  व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजित कार्यक्रमाला रामेश्वर शर्मा हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शर्मा यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवलं आहे.

३.बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण  
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी पुर्वपदावर येत आहेत. अशातच आता सायना नेहवाल थायलँड ओपन सुपर 1000 टुर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा 12 ते 17 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु, आता कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

४.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तरुणाचं पत्र
वाशिमच्या एका तरुणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नोकरी नसल्याने होणारी घुसमट मांडणार पत्र लिहिलं आहे. “मला नोकरी द्या, नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या, अशी मागणी या तरुणाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गजानन राठोड असं या तरुणाचं नाव आहे. त्याने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून, चर्चेचा विषय ठरलं आहे. या पत्रातून त्याने वाढती बेरोजगारी आणि सरकारकडून वेळेवर न होणाऱ्या नोकर भरतीच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या तरुणांची व्यथा एका पत्राद्वारे चव्हाट्यावर आणलीय. 

५. महापालिकेच्या रणनीती आखणीला मनसेची सुरुवात
राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात असणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे सुरु आहे. या बैठकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील सदस्यांना संबोधत महानगरपालिकांनुसार टीम स्थापन करण्याचे आदेश दिले आहे.  

६. व्हाट्सअपने दिले पुन्हा स्पष्टीकरण म्हणाले
इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असे स्पष्टीकरण व्हाट्सअपकडून देण्यात आले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केला.

७. देशातील नवीन कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट
कोरोना संकट नियंत्रणात येत नसले, तरी देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४ तासांत १२ हजार ५८४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

८. निवडणुकीत अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी 
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.  मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेत अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधलाय. 

९.बीएमडब्ल्यूची नवीन कार भारतात लाँच   
लग्जरीयस कार बनवणारी कंपनी बीएमडब्ल्यूने आज भारतात त्यांची नवीन कार बी  एम  डब्ल्यू टू  सिरीज  ग्र्यान कुप  लाँच केली आहे. या कारची सुरवातीची किंमत 40.90 हजार रुपये इतकी आहे. कंपनीने ही कार एम स्पोर्ट्स पॅकेजसह सादर केली आहे. ही नवीन बी एम डब्ल्यु 220 आय पेट्रोल व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारचं उत्पादनबी एम डब्ल्यु  च्या चेन्नई येथील प्लांटमध्ये केलं जाणार असून कंपनीने ही कार यापूर्वीच दोन डिझेल व्हेरियंट्समध्ये सादर केली आहे.  

१०.मंत्रालयात शॉर्ट सर्किट
मुंबई मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किट झाला आहे. मात्र, वेळीच सगळे  स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हा शॉर्ट सर्किट झाला. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या दालनात अंधार आहे. लाईट गेल्याने अनेक विभागाची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, सध्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *