Breaking News

1/breakingnews/recent

केशरचे आरोग्यदायी फायदे

No commentsमुंबई -

केशर हे जगातील एक दुर्मिळ मसाल्याच्या पदार्थां पैकी एक आहे. खाद्यपदार्थांना रुचकर करण्यासाठी अगदी पुरातन काळापासून केशराचा वापर केला जातो. लालसर आणि गुलाबी रंगाच्या केशराची निर्मिती स्पेन, इटली, ग्रीस, तुर्किस्तान, इराण, चीन आणि भारतात होते. भारतात जम्मू आणि काश्मिरमध्ये केशर मोठ्या प्रमाणावर निर्माण केलं जातं.  त्यामुळे जम्मू आणि काश्मिरमधील लोकांसाठी केशर हे उत्पन्नांचे एक प्रमुख साधन आहे. केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशरचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं. मात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम आहे. शिवाय ते सौंदर्य वाढविण्यासाठी सर्वोत्तम आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. नैवेद्य शुद्ध करण्यासाठी त्यात आवर्जून केशर वापरलं जातं. शिवाय केशरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअम असते. अनेक पोषक तत्वांमुळे अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच केसर उपयुक्त असते. त्वचेच्या स्वास्थासाठी प्राचिन काळापासून सौदर्य उत्पादनांमध्ये केशराचा वापर करण्यात येतो. केशराचा अती वापर मात्र घातक ठरू शकतो.


१. स्वयंपाकासाठी
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये केशराचा वापर केला जातो. कोणताही गोड पदार्थ केशराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खीर, बिर्याणी, लस्सी, मसाले दूध, मोदक, रसमलाई अशा  अनेक पदार्थांची सजावट केशराने केली जाते. मात्र लक्षात ठेवा केशर उष्ण गुणधर्माचे असल्याने स्वयंपाकात दररोज केशराचा वापर करू नका. कधीतरी केशराचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. केशरामुळे खाद्यपदार्थ आणखी स्वादिष्ट होतात.

२. स्मरणशक्ती वाढते
केशरामुळे स्मरणशक्ती वाढते. कारण केशरामध्ये मेंदूचे कार्याला उत्तेजना मिळते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी त्यांना नियमित केशर दिले जाते. शिवाय वयोमानानुसार वृद्धांमध्ये होणाऱ्या अल्झामर आणि विस्मरणाच्या समस्येला दूर करण्यासाठी वृद्धांनादेखील केशराचा चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी घरातील सर्वांनी केशराचे  दूध घेण्यास काहीच हरकत नाही.

३. पचन संस्था सुधारते
केशरामुळे पचनाच्या कार्यात चांगली सुधारणा होऊ शकते. ज्यांना पोट दुखणे, अॅसिडिटी, अल्सर अथवा  पचनासंबधित अन्य समस्या असतील त्यांनी नियमित केशराचा वापर करावा. थोडक्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी केशर एक उत्तम औषध आहे.

4. दम्याचा त्रास कमी होतो
प्राचिन काळी दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांवर केशराचा उपचार केला जायचा. केशरामुळे श्वसनसंस्था सुधारते. वातावरणात बदल झाल्यास अस्थमाच्या रूग्णांना सर्वात जास्त त्रास होऊ लागतो. असे असल्यास नियमित केशराचे  दूध प्या. ज्यामुळे तुम्हाला दम्याचा त्रासापासून आराम मिळेल. कारण केशरामुळे फुफ्फुसांमधील सूज आणि जळजळ कमी होते. असं असलं तरी दम्याच्या त्रासासाठी तज्ञांचा सल्ला घेणे हेच योग्य ठरेल.

5. शांत झोप येते
आजकालच्या धावपळीच्या काळात पुरेशी झोप मिळणं फारच कठीण झालं आहे. कामाचा ताण, दैनंदिन चिंता, सतत होणारा स्मार्टफोनचा वापर यामुळे निवांत झोप येत नाही. वास्तविक निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दररोज कमीतकमी आठ तास झोप घेणं गरजेचं असतं. मात्र आजकाल अनेकजण उशीरा झोपतात त्यामुळे त्यांना अपुऱ्या झोपेच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना केशराचे दूध प्या. ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप मिळू शकेल.

6. कर्करोगापासून दूर ठेवते
केशरामध्ये कर्करोगाला दूर ठेवण्याची ताकद असते. एका संशोधनानुसार केशर कर्करोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण केशरातील क्रोसिनमुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत. त्यामुळे स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग अथवा पोटाचा कर्करोग असल्यास त्या रूग्णाला केशर दिले जाते. रक्ताच्या कर्करोगावरही केशर फायदेशीर ठरते.

7. गरोदर महिलांसाठी फायदेशीर
वास्तविक गरोदर महिलांना केशर कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रेगन्सीमध्ये थोड्याप्रमाणात केशर घेण्यास काहीच हरकत नाही. कारण केशरामुळे गरोदर महिलांना पोटातील गॅस आणि हातापायावर येणारी सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. गरोदरपणामध्ये चिंता काळजी केल्यामुळे अनेक महिलांना डिप्रेशनचा सामना करावा लागतो. नैराश्य गरोदर महिला आणि त्यांच्या पोटातील बाळासाठी घातक ठरू शकते. मात्र केशरामुळे गरोदर महिलांना शांत वाटू शकते. त्यामुळे झोप आणि आराम मिळण्यासाठी दूधातून थोड्याप्रमाणात केशर घेण्यास काहीच हरकत नाही. गरोदरपणी केशर खाल्यास बाळ गोरं होतं असाही एक समज आहे. मात्र गरोदरपणी कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेणे हे अपायकारकच असते. त्यामुळे अतीप्रमाणात केशराचा वापर करू नका. शिवाय केशराचे दूध घेण्यास सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

8. नितळ आणि चमकदार त्वचेसाठी
केशर केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमचे सौंदर्य वाढविण्यासाठीदेखील तितकेच उपयुक्त आहे. चेहरा नितळ दिसण्यासाठी आणि त्वचेवरील ग्लो वाढविण्यासाठी केशराचा फेसपॅक वापरण्यात येतो. यासाठी दूधामध्ये केशर मिसळून ते कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. काही मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून काढा. हा फेसपॅक नियमित अथवा आठवड्यातून दोनदा लावल्यास तुमच्या त्वचेवर नॅचरल ग्लो दिसू लागेल. याशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तुम्ही तेही केशराच्या मदतीने कमी करू शकता. यासाठी पपईचा गर आणि दूध,मध आणि चिमूटभर केशर मिक्सरमध्ये एकत्र करून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. केशरातील अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होतील. पपईच्या गरामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल. दूध आणि मधामुळे तुमच्या त्वचेचे पोषण होईल ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होईल.

९. पिंपल्स कमी करण्यासाठी
त्वचा तेलकट असेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरमं अथवा पिंपल्स दिसू लागतात. केशरामध्ये या मुरमांना कमी करण्याची शक्ती आहे. पिंपल्स कमी करण्यासाठी  केशर आणि चंदन पावडरचा फेसपॅक तयार करा. सनटॅन कमी करण्यासाठीदेखील तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये दूध घ्या त्यात केशर आणि चंदन पावडर मिसळून फेसपॅक तयार करा. पाच मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका.

१०. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी
केशरामधील अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुमच्या चेहऱ्याचे योग्य पोषण होऊ शकते. यासाठी मध, बदाम आणि केस एकत्र करून फेसपॅक तयार करा. रात्रभर बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बदाम, मध आणि केसर मिक्सरमध्ये वाटून घ्या. या पेस्टमध्ये लिंबूरस आणि थोडं कोमट पाणी टाका. तयार फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका. नियमित हा फेसपॅक लावल्यास तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *