अजून एक दिवसाने रुग्णालयात, गांगुलीचा मुक्काम वाढला
मुंबई -
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला गुरुवारी 7 जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. गांगुलीला आज 6 जानेवारीला मुक्काम देण्यात येणार होता. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मात्र गांगुलीनेच रुग्णालयातील एक दिवसाचा मुक्काम वाढवून घेतला असल्याचं वुडलॅंड्स रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली बासू यांनी सांगितले.
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर त्याला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गांगुलीच्या स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात आली. गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. दरम्यान त्यानंतर गांगुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर सोशल मीडियावर गांगुलीने केलेली खाद्यतेलाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. तुमच्या चांगल्या ह्रदयासाठी खाद्य तेल चांगले असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. यामुळे या खाद्यतेलाच्या जाहीरातीवरुन नेटीझन्सने संबंधित कंपनीला चांगलेच ट्रोल केले आहे. तसेच गांगुलीची खाद्यतेलाची जाहिरात काही काळासाठी थांबवण्यात आल्याचे वृत्तही समोर येत आहे. गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. या आजारामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. योग्य आणि सुरळीतपणे रक्तपुरवठा न झाल्याने गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

No comments
Post a Comment