जिल्ह्याची खबरबात - 'ऑपरेशन मुस्कान' मध्ये अहमदनगर पोलिसांचे यश
News24सह्याद्री - 'ऑपरेशन मुस्कान' मध्ये अहमदनगर पोलिसांचे यश..पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. सुपा पोलिसांचे "अतिक्रमण हटाव"
नगर- पुणे महामार्गावरील सुपा येथील सुपा चौक ते पारनेर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केलेले होते. त्या विरोधात पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी वीस पोलीसांच्या ताफ्यासह आक्रमक भूमिका घेत कडक कारवाई केली.नववर्षाच्या मुहूर्तावर सुपा पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे.
--------
2. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आमदारांवर कायदेशीर कारवाई करा - राम शिंदे
निवडणुका हे लोकशाहीचे लक्षण आहे. मतदानातून लोकप्रतिनिधी निवडला जातो. परंतु जर आर्थिक प्रलोभन दाखवून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर याला लोकशाही म्हणत नाहीत. म्हणून आमदार रोहित पवारांसह ज्या आमदारांनी आर्थिक प्रलोभन दाखवून आदर्श आचारसंहितेच भंग केला आहे. त्या सर्व आमदारांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
--------
3. राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द ग्रामपंचायत बिनविरोधच्या दिशेने
राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. नुकतीच राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वॉर्डातून 9 जागांसाठी 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने काही जागांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आहेत .
----------
4. १ हजार २५८ उमेवारांचे अर्ज पात्र
जामखेड तालुक्यात ४९ ग्रामपंचायत साठी १३०२ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्या पैकी १२५८ अर्ज पात्र करण्यात आले तर ४४ अर्ज बाद झाले. त्यामुळे उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपात्र झालेल्या उमेदवारांच्या अर्जामध्ये काही त्रुटी तसेच मागील निवडणूकीत खर्च वेळेत दाखल न करणे यासह विविध कारणांनी ४४ जनांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
---------
5. दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाला भोकसले
संगमनेर शहरातील मदिना नगर परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. एका गटाशी किरकोळ कारणावरून वाद घालीत दुसऱ्या गटातील तिघांनी जीवघेणा हल्ला चढवला. हल्ल्यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने एक तरुण अत्यवस्थ झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांना ताब्यात घेत. त्यातील दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून एक संशयित अल्पवयीन असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये.
--------
6. कोपरगावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकशे पाच कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
कोपरगाव शहराला सध्या सहा दिवसातुन पाणीपुरवठा होतो. पालिकेकडे पाणीसाठवण क्षमता कमी असल्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न कायम स्वरूपी सोडण्यासाठी एकशे पाच कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर काँक्रिटीकरण आणि प्रभाग क्रमांक सहामधील रस्त्याचे डांबरीकरण विकास कामांचा शुभारंभ आमदार काळे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.
-----------
7. ग्रामपंचायत निवडणूक अर्ज छाननीत 1हजार 885 अर्ज वैध
नगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज छाननीत 1 हजार 885 अर्ज वैध ठरले असून सेहेचाळीस अर्ज बाद ठरले आहेत. तर वारूळवाडी ग्रामपंचायत निवडणूक ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होणार असून 4 जानेवारीपर्यंत माघारीची मुदत देण्यात आली आहे. नगर तालुक्यात 59 ग्रामपंचायतीच्या दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाली
-------
8. भाजपकडून तेढ निर्माण करणारे राजकारण - महसूलमंत्री थोरात
सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, शहरांची नावे बदलून काय होणार. भारतीय जनता पक्षाचे राजकारण विकासाच्या मुद्द्यांवर नाही निवडणुका तोंडावर आल्या की त्यांच्याकडून भावनिक मुद्दा पुढे करत समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीये. संगमनेर मधील यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
----------
9. 'ऑपरेशन मुस्कान' मध्ये अहमदनगर पोलिसांचे यश
१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडून 'ऑपरेशन मुस्कान' ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरवलेल्या महिला, पुरुष तसेच बालकांचा शोध घेण्यात आला.
यामध्ये हरविलेली ७७ बालके आणि १०९१ प्रौढांना पोलिसांनी यशस्वीरीत्या शोधून काढले. यात ६२१ महिला आणि ३९० पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 'ऑपरेशन मुस्कान' दरम्यान अहमदनगर पोलिसांना रेकॉर्डमध्ये नसलेली ४७ मुले मिळाली आहेत. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अशी माहिती अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
--------
10. महा विकास आघाडी सरकारच्या काळात आरोपीने पोलिसांचा धाकच नाही - स्नेहलता कोल्हे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोपींना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने राज्यात मुली व महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या विकृतीने कळस गाठला असून आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे फास्टट्रॅक कोर्टातील केसेस प्राधान्याने मार्गी लावून लेकीना न्याय दिल्यास या प्रवृत्तींना आळा बसेल अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे
No comments
Post a Comment