स्पेशल रिपोर्ट - एका भ्याड हल्ल्याची १९ वर्षे
News24सह्याद्री - एका भ्याड हल्ल्याची १९ वर्षे...पहा सह्याद्री special रिपोर्ट
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या भारतीय संसद भवनावर आजपासून १९ वर्षांपूर्वी म्हणजेच १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. या हल्ल्यात भारताच्या ५ सैनिकांसह ५ सीआरपीएफ महिला कॉन्स्टेबल आणि २ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. याशिवाय हल्ला करण्यासाठी आलेल्या पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. चला, आज आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, त्या जवानांच्या शौर्याची आणि दहशतवाद्यांच्या क्रौर्याची अशा घटनांच्या पुनरावृत्तीचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. चला, बघुया त्या दिवशी नेमके काय घडले होते? संसद भवनात हिवाळी अधिवेशन चालू होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अधिवेशनासाठी उपस्थित होते. विरोधी पक्षात सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत संसद भवनात जोरदार गदारोळ झाला.
त्यानंतर संसद भवन ४० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आपल्या शासकीय निवासस्थानावर रवाना झाले होते. तथापि, तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी सुमारे २०० खासदारांसह संसद भवनातच होते. याव्यतिरिक्त पत्रकार आणि मिडियाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय उपराष्ट्रपती कृष्णकांत शर्मा हेदेखील संसदेच्या बाहेर पडत होते. त्यांचे सुरक्षारक्षक त्यांची वाट पहात होते इतक्यात एक पांढरी एंबेसडर कार वेगात येताना दिसली. संसद भवनच्या नियमांविरूद्ध कारचा वेग पाहून संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षारक्षक सतर्क झाले. हालचालींना वेग आला. लोकसभा सुरक्षा कर्मचारी जगदीश यादव या कारच्या मागे पळताना दिसले, ते सतत कार थांबवण्याचा इशारा करत होते. जगदीश यांना असे पळताना पाहून उपराष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षक एएसआय जीत राम, एएसआय नानक चंद आणि एएसआय श्याम सिंह यांनीही गाडी थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले. सुरक्षा कर्मचारी धावत येताना पाहून कारमधून पाच सशस्त्र दहशतवादी बाहेर आले, त्यांच्याकडे एके-47 होत्या. बाहेर येताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
चकमकीचा आवाज ऐकून सुरवातीला आतील लोक त्या आवाजाला फटाक्यांचा आवाज समजले होते. यानंतर, एक मोठा स्फोट झाला, ह्या स्फोटाबरोबरच संसदेत उपस्थित असलेल्यांना समजले कि, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर म्हणजेच, भारतीय संसद भवनावर, दहशतवादी हल्ला झाला आहे. संसद भवनात सर्वत्र गोंधळ माजला, वाट फुटेल तसे लोक सर्वत्र सैरावैरा पळू लागले . पाचही दहशतवादी एंबेसडर कारच्या आसपास राहून अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्ब हल्ला करत होते. त्यानंतर, दहशतवाद्यांना गेट क्रमांक 11 कडे जमलेले पाहून दिल्ली पोलिस, सीआरपीएफचे जवान आणि संसद भवनचे सुरक्षा कर्मचारी गेट क्रमांक 11 च्या दिशेने सरसावले. दुतर्फा गोळीबार सुरु झाला होता. त्यातच एका दहशतवाद्याला गोळ्या लागून तो पडला. मात्र कोणीही त्याच्या जवळ गेले नाही, तो स्वतःला बॉम्बने उडवून देण्याची भीती होती.
झालेही तसेच, आपल्याला चारही बाजूंनी वेढलेले पाहून त्याने बॉम्बचा वापर करून आत्मघाताचा रस्ता निवडला. दरम्यान गोळीबारापासून काही अंतरावर असलेले गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनाही त्यावेळी हल्ल्याची बातमी मिळाली होती. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी आणि संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह सर्व वरिष्ठ मंत्र्यांना तातडीने सदनाच्या आत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. याशिवाय संसद भवनमधील दरवाजेहि बंद होते. दहशतवादी त्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, या अगोदर सुरक्षा जवानांनी आपली स्थाने बदलली होती. ज्यामुळे दहशतवादी संसद भवनात प्रवेश करण्यात अपयशी ठरले. या हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांनाएक-एक करून कंठस्नान घालण्यात आले या हल्ल्यातील शहिदांच्या हौतात्म्य आणि पराक्रमासाठी देश त्यांचे आजही स्मरण करतो.
No comments
Post a Comment