Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट सह्याद्रीचा - एसपी साहेब, रेखा जरे यांचा प्रिप्लॅन्ड मर्डर झालाय !

No comments

     News24सह्याद्री -




यशस्वीनी महिला ब्रिगेड आणि त्याआधी राष्ट्रवादी या राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली नगर शहरासह जिल्ह्यात विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेणार्‍या रेखा जरे यांची हत्या झाल्याची बातमी आली. दुचाकीस्वाराने त्यांच्या चार चाकी वाहनाला कट मारला आणि त्यातून शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातूनच या दुचाकीस्वाराने थेट त्यांच्या गळ्यावर चाकूचे वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या आणि दुचाकीस्वार निघून गेले. या संपूर्ण घटनेचा विचार केला तर गाडीला कट मारला या किरकोळ कारणातून कोणताही वाहन चालक खून करण्यापर्यंत मजल मारुच शकत नाही हे वास्तव विचारात घेतले पाहिजे. एसपी साहेब, तुम्ही आणि तुमच्या टीमच्याही ही बाब लक्षात आलीच असेल. मग, आता खुन्याचा तपास लावतानाच त्याच्या मागचा मास्टरमाईंड देखील शोधा! घटना घडून मोठा कालावधी उलटला. दुसरा दिवस उजाडला असताना जरे यांच्या हत्येचा, मारेकर्‍यांचा तपास लावा असं साधा चार ओळीचं पत्र एकाही महिला कार्यकर्ती, महिला संघटना अथवा राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांनी दिले नाही. याचा अर्थही एसपीसाहेब तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. कोणीतरी बडं प्रस्थ या खून प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्याने जरेबाईची वाट लावली असताना आपण त्याबाबत पत्रक काढणे म्हणजेच हे प्रस्थ आपल्यामागे हातधुवून लावून घेणं, असंच काहीस मत बहुतांश महिलांचं झालेलं असावं! मात्र, वाघ म्हटले तरी खाणार आणि वाघोबा म्हटले तरी खाणार या युक्तीनुसार रेखा जरे जात्यात गेली आणि मुग गिळून गप्प बसलेल्या समस्त महिला सुपात आहेत याचे भान आणि जाण ठेवण्याची गरज आहे. 

कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही! रेखा जरे यांच्या हत्याकांडात अत्यंत शांत डोके लावून त्यांचा मर्डर घडवून आणला गेेलाय आणि चर्चा घडवून आणली जाते ती वाहनाने कट मारल्याची आणि त्यातून झालेल्या बाचाबाचीची!रेखा जरे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून वठविलेली भूमिका, त्याआधी विविध सामाजिक प्रश्‍नांवर केलेली आंदोलने, प्रशासनाला विचारलेला जाब, महिलांचं संघटन करण्यात घेतलेली महत्वपूर्ण भूमिका नगरकरांच्या कायम स्मरणात राहणारीच आहे. खरे तर आंदोलन अथवा विशिष्ट विषयाच्या माध्यमातून त्यांचे काहींशी मतभेदही झाले असतील.मात्र, ते टोकाचे नक्कीच नव्हते! त्या अनेकदा नगर सह्याद्रीच्या कार्यालयात यायच्या आणि विविध विषयांवर बोलायच्या! आपल्या जीवाला धोका आहे, असं त्यांच्या बोलण्यातून कधी जाणवलं नाही. सर्वच राजकीय पक्ष, संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. मग, असे असताना त्यांचा खून कशामुळे आणि कोणत्या कारणाने होऊ शकतो असा प्रश्‍न समस्त महिलांना पडलाय! रेखा जरे यांच्या खुनाचा उलगडा तातडीने होण्याची गरज आहे. कारण हे प्रकरण नाजूक वळणावर आल्याची चर्चा आहे.रेखा जरे यांच्या हत्येमुळे चळवळीत काम करणार्‍या महिला, राजकीय पक्षांच्या महिला आघाड्यांमधून काम करणार्‍या महिलांना त्यांच्या घरातून बाहेर सोडले जाईल का हा खरा प्रश्‍न आहे. जरे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी अंधार होता. जातेगावच्या घाटात वाहनाचा वेग कमी होतो आणि हा कमी होणारा वेगच जरे यांच्या मारेकर्‍यांनी टीपला होता. 

बरोब्बर त्या वळणार त्यांची गाडी आली आणि पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी त्यांच्या चार चाकी वाहनाला आडवी लावली! शाब्दीक बाचाबाचीत त्यांनी त्यांच्या गाडीची काच खाली घेतली.मारेकर्‍याने थोडावेळ वाद घालण्याचे नाटक केले आणि दुसर्‍या क्षणाला त्याने त्याच्याकडील धारदार चाकूने रेखा जरे यांचा गळा कापला! जरे यांच्या बाजूलाच नगरच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी बसल्या होत्या! याशिवाय रेखा जरे यांचा मुलगा आणि आई देखील गाडीत होते. या सर्वांनी वाहन चालकाच्या शीटवर रक्तबंबाळ झालेल्या रेखा जरे यांना शेजारच्या शीटवर बसवले आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी असणार्‍या विजयमाला माने या स्वत: चालकाच्या शीटवर बसल्या. त्यांनी भरधाव वेगात गाडी सुप्याच्या दिशेने चालवली. सुपा टोल नाक्यावर आल्यानंतर तेथून ऍम्बुलन्समध्ये रेखा जरे यांना नगरला हलवले. मात्र, नगरला येईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.जिल्हा रुग्णालायच्या सुत्रांनी जरे यांना मृत घोषीत केले. जरे यांचा जीवनप्रवास अखेर संपला! मात्र, जरे यांची हत्या झाल्याच्या दिवशी त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. पुण्याला जाताना हेच तीघे त्यांच्या सोबत होते आणि येताना देखील हेच तीघे त्यांच्या सोबत होते. विजयमाला माने या त्यांच्या शासकीय कामासाठी गेल्या होत्या आणि त्यांचे काम आटोपून त्या पुन्हा या तीघांच्या सोबत माघारी आल्या! पोलिसांना या घटनेच्या खोलात जावे लागणार आहे. रेखा जरे यांना कोणी धमकावत होते का? त्यांच्या जीवनाशी कोणी खेळत होते का? त्यांचा कोणाशी संघर्ष झाला होता का? या प्रश्‍नांच्या खोलात पोलिसांना जावे लागणार आहे. 

आणि त्यासाठी जरे यांच्या सहवासात आलेल्यांकडून पोलिसांना माहिती घ्यावी लागणार आहे. मात्र, ही माहिती घेताना त्या महिलांना विश्‍वास द्यावा लागणार आहे आणि विश्‍वासात घ्यावे लागणार आहे. असे झाले तर आणि तरच रेखा जरे यांच्या खुनाचा म्होरक्या, मास्टरमाईंड शोधला जाऊ शकतो. पोलिसांनी मारेकर्‍याचे छायाचित्र जाहीर केले आहे. मारेकरी सापडतीलही! मात्र, पोलिसांनी हे प्रकरण वेगळ्या अँगलमधून हाताळले तर मारेकर्‍यांच्या आधी मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात येऊ शकतो!एसपी साहेब, रेखा जरे यांच्या हत्येने महिलांमध्ये असुरक्षीततेची भावना नक्कीच वाढली आहे. महिलांनी एकटीने प्रवास करायचा की नाही असा प्रश्‍नच यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जरे यांचा खून गाडीला कट मारल्याच्या कारणातून नव्हे तर त्यांचा खून पूर्वनियोजित होता आणि तो कसा होता हेच आता पोलिसांना सांगावे लागणार आहे. तरच महिलांमधील भिती कमी होऊ शकते. हे काम आता पोलिसांचे आणि त्यांच्या टीमचे नेतृत्व करणार्‍या पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आहे.रेखा जरे यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधी नगर शहरातील तपोवन रस्त्यावर एका टोळक्याने किरकोळ कारणातून महिला- मुलींना लाकडी दांडक्याने जनावरासारखे बदडून काढण्याची घटना घडली. या घटनेचा व्हीडोओ आमच्या हाती आलाय! अर्थात तो सोशल मिडियावर व्हायरल झालाय! याबाबत भाष्य करण्याआधी आपण तो व्हीडोओ पाहू.नगर शहरातील तपोवन रस्त्यावर सुर्यनगर वसाहतीमध्ये महिलांना बेदम मारहाण करण्यात आली. कोणतेही कारण नसताना एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी हातात दांडके घेऊन महिला आणि मुलींना बेदम चोप दिला. 

दरोडेखोर आल्यासारखे हे टोळके आले आणि मारहाण करीत राहिले. याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. याबाबत स्थानिक नागरिक तोफखाना पोलिस ठाण्यात गेले. मात्र, निरीक्षक मुलानी यांनी त्यांना कोणतीही दाद दिली नाही. अत्यंत गंभीर असा हा प्रकार असताना तोफखान्याच्या निरीक्षकांना यात काहीही विशेष वाटले नाही. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असताना त्या विरोधात मोहिम राबविण्याचे धाडस केले जात नाही. समाजकंटक अशा पद्धतीने हातात दांडके घेऊन महिला- मुलींना बेदम चोप देत असतानाही तोफखान्याचे पोलिस बघ्याची भूमिका घेतात. तोफखाना पोलिसांना नक्की काय अभिप्रेत आहे असाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. अर्थात या प्रश्‍नाचे जनतेला आता थेट पोलिस अधीक्षकांकडून अपेक्षीत आहे.एसपी साहेब, खाकीतील बदमाशांना तुम्ही गेल्या महिना- दोन महिन्यात खड्यासारखे बाजूला केले. आता जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सुर्यनगरमधील महिलांना न्याय देण्याची भूमिका न घेणार्‍या तोफखान्यातील मुजोर अधिकार्‍यांना याचा जाब विचारलाच गेला पाहिजे. ते तुम्ही नक्की करताल! मात्र, आता त्या जोडीने रेखा जरे यांच्या मारेकर्‍याला आणि या घटनेतील मास्टरमाईंडला लवकर शोधण्याचं आव्हान तुम्ही आणि तुमची टीम कसं पार पाडतेय याकडे नगरकरांच्या नजरा लागल्या आहेत

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *