मोठी बातमी - नव्या विषाणूने नव्याने धास्तावले प्रशासन
News24सह्याद्री -
ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या करोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारतानंही खबरदारीचा उपाय म्हणून नवी नियमावली जाहीर केलीय. नव्या नियमानुसार, यूकेहून येणाऱ्या प्रवाशांपैंकी नव्या करोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय करोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. तर ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी करणं अनिवार्य आहे. या टेस्टमध्ये करोना संक्रमित आढळलेल्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये इन्स्टिट्युशन क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. पॉझिटिव्ह आढलेल्या रुग्णांचे नमुने 'जिनोमिक सिक्वेंसींग'साठी पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'ला पाठविण्यात येतील.
या नव्या विषाणूच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे . सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. करोना स्थिती, करोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवा. स्थानिक पातळीवर करोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का, याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या करोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्क फोर्सने अभ्यास करावा', अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
No comments
Post a Comment