आता केंद्राच्या परवानगीकडे लक्ष - आरोग्यमंत्री टोपे
मुंबई
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. “लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे,” असं राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. “करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज आहे. ते काम अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात सुरु आहे. अदर पूनावाला यांनीदेखील महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट दिले होते ते आम्ही पूर्ण केले असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती दिली आहे. तसंच तरुणांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहनही केले आहे. ते म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात अनेक महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं होऊ शकली नाही. ज्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.

No comments
Post a Comment