आपला तो बाब्या अन दुसऱ्याचं ते कार्ट : सचिन सावंत
News24सह्याद्री -
मुंबई -
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आज घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केल. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे.तसेच, 'विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळत आहे. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?', असे सवाल सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
पुढे सावंत म्हणाले की, 'भाजप हीन पातळीच राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिले ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने छापे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?', असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहे.
याच दरम्यान, 'सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपमध्ये प्रवेश दिले','भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारी सगळं चालले आहे ते सत्तेसाठी आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहे', असे सचिन सावंत म्हणाले आहे.

No comments
Post a Comment