मोठी बातमी - दावणीला नाही जनावरे, तरीही वाटले गेले लाखो रुपयांचे कर्ज...
News24सह्याद्री -
सहकाराचे माहेरघर समजल्या जाणार्या अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा बँकेत सध्या गडबड चालू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नाबार्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्यांना पशुधनासाठी आवश्यक चारा आणि तत्सम गोष्टींसाठी कर्ज देण्याची योजना राबविली जाते. नाबार्डच्या या योजनेसाठी जिल्हा बँकेकडून प्रति जनावर पंधरा हजार रुपये इतकी रक्कम कर्ज स्वरुपात दिली जात आहे. शेतकर्यांनी त्यांच्या गावातील सेवा सोसायटीच्या माध्यमातून कर्ज मागणी केल्यानंतर हे कर्ज दिले जाते. मात्र, त्याआधी बँकेच्या शाखाधिकारी व सेवा संस्थेच्या सचिवाने त्या शेतकर्याच्या गोठ्यावर जाऊन त्याच्या गायी किती आहेत याची पाहणे करायची आणि तसा रिपोर्ट तयार करायचा असतो. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा बँकेकडून या शेतकर्यांना कमीत कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. हे कर्ज त्याला मार्च २०२० मध्ये भरणे आवश्यक आहे.योजना चांगली असली तरी या योजनेच्या आडून गोठ्यात एकही जनावर नसलेल्या शेतकर्यांनाही कर्ज दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दावणीला जनावरेच नसतील आणि अशा शेतकर्यांना कर्ज दिले जात असेल तर ते वसूल कसे होणार? राहुरीसह अन्य काही कारखान्यांना असेच कर्ज दिले आणि हे कर्ज वसुल झाले नाही. त्यातून जिल्हा बँक अडचणीत आली! आता जनावरांना कर्ज देण्यासाठी ज्या काही चार- पाच संचालकांनी चुकीच्या पद्धतीने बँकेच्या अधिकार्यांवर दबाव आणण्याचे काम सुरू केले आहे, त्यात अध्यक्षांसह नगर, श्रीगोंद्यातील संचालकांचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्हा बँक ही शेतकर्यांची बँक! शेतकर्यांसह सामान्य जनतेच्या हजारो कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप झाले तर ते वसुल कसे होणार असा प्रश्न बँकेचे संचालक ऍड. उदय गुलाबराव शेळके यांनी उपस्थित केला आहे. बँकेतील पैसे कोणाची जहागीरी नाही, कोणी उठेल आणि हजार कोटी, पाचशे कोटी वाटप केल्याबाबत बोलत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे! शेतकर्यांना हे अनुदान नसून त्यांना कर्ज दिले जात आहे. त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली तर त्यांना बँकेला कर्ज द्यावेच लागणार आहे. त्यात संचालकांनी फोटोसेशन करण्यात काहीच अर्थ नाही! पैसे सामान्य ठेवीदारांचे आणि पैसे व्याजाने दिले जात असतील तर त्यात कोणाचाही संबंध नाही. दावणीला जनावरे नसताना काही ठिकाणी कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी आपणाकडे आल्या असून याबाबत आपण स्वत: कार्यकारी संचालकांशी बोललो आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर आपण राज्य शासनाकडे तक्रार करू असा सज्जड इशाराही ऍड. उदय शेळके यांनी दिला आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष असणारे सीताराम पाटील गायकर हे अकोल्याचे! पिचड समर्थक म्हणून त्यांची ओळख! त्यांना या संपूर्ण प्रकराबाबत काहीही माहिती नाही! माहिती घ्यावी लागेल असे त्यांचे उत्तर!
प्रशासकीय कामाच्या अनुषंगाने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे हे काम पाहतात! त्यांच्याशी न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी संपर्क केला. काय म्हणालेत कार्यकारी संचालक श्री. वर्पे पाहू यात अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. बँकेच्या संचालकांनीच हा प्रकार उघड केल्यानंतर कार्यकारी संचालक याबाबत सारवासारव करु लागले असल्याचे दिसतेय! बँकेकडे असणार्या ठेवींमधूनच हे कर्ज दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जनावरे नसताना कर्ज दिले जात असेल, दिले गेले असेल तर त्याची चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. जनतेच्या ठेवींमधून असे चुकीचे कर्ज दिले गेले तर ते वसुल होण्याची शक्यता फारच कमी! म्हणूनच जिल्हा बँकेतील या कथीत प्रकाराबाबत बँकींगचा गाढा अभ्यास असणारे ज्येष्ट संचालक आणि बँकेचे माजी उपाध्यक्ष ऍड. उदय गुलाबराव शेळके यांनी आवाज उठविला असल्याचे दिसते! पाहू यात यात जिल्हा बँक पदाधिकारी आणि प्रशासन काय भूमिका घेते ते
No comments
Post a Comment