मोठी बातमी - कायद्याचा धाक संपला : मुजोर रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला नेले फरफटत
News24सह्याद्री -
कायद्याचे राज्य आहे की नाही असाच काहीसा प्रश्न एका घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे. अवैध व्यावसायिकांची मुजोरी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय! आता तर रिक्षावाल्याने देखील कायदा हातात घेतल्याचा धक्क़ादायक प्रकार समोर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा चालकाला पोलिसांनी थांबविले. त्याची रिक्षा ताब्यात घेऊन पोलिस त्या रिक्षा चालकाच्या शेजारी बसला. मात्र, याच दरम्यान सदरच्या रिक्षा चालकाने बाजूला बसलेल्या वाहतूक पोलिसाला जोराचा धक्का दिला आणि हा पोलिस कर्मचारी भरधाव वेगातील रिक्षातून बाहेर फेकला जाऊ लागला! पोलिसाने प्रसंगावधान राखले आणि रिक्षाला एका हाताने पकडून ठेवले! मात्र, त्याचे पाय जमिनीवर फेकले गेले.
त्या अवस्थेत रिक्षा चालकाने त्या पोलिसाला फरफटत नेले!अंगावर शहारे आणणारी ही घटना घडलीय औरंगाबाद शहरात! जालना रस्त्यावरील उच्च न्यायालयाच्या चौकात सकाळी ११ वाजता सदरचा थरार घडलाय!वाहतूक पोलिस अंमलदार हसिबोद्दीन गयासोद्दीन शेख हे उच्च न्यायालय चौकात गुरुवारी त्यांचे सहकारी गानोराव घुगे यांच्यासोबत ड्यूटी करीत होते. वसंतराव नाईक चौकाकडून आलेली रिक्षा या सिग्नलवर थांबली. रिक्षात समोरच्या सीटवर दोन आणि मागील सीटवर चार प्रवासी बसलेले होते. पोलिस अंमलदार शेख यांनी चालकाकडून रिक्षातील प्रवासी उतरवून घेतले. यानंतर संबंधितावर कारवाई करण्यासाठी रिक्षा चालकासोबत पुढच्या सीटवर बसून रिक्षा बाजुला घेण्यासाठी सांगितले.
आणि याच दरम्यान हा प्रसंग घडला. प्रसंगवधान राखत चालकाच्या सीटजवळील लोखंडी पाइप पकडला. रिक्षा चालकाने वेग आणखी वाढविला. त्यामुळे ते रस्त्यावर पाडले. त्यावेळी पायावरून रिक्षाचे चाक गेल्यामुळे गयासोद्दीन हे जखमी झाले. गयासोद्दीन यांच्यासोबत काम करणार्या वाहतूक अमंलदार गोनाराव घुगे यांनी रिक्षाचालक फारूख शहा याला अटक केली. या चालकाविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात कायद्याचा धाक औरंगाबाद शहरात संपलाय हे सिद्ध झाले आहे. पोलिस आणि त्यांच्या टिम लिडरने अर्थात पोलिसा कमीशनर यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
No comments
Post a Comment