मोठी बातमी - गोमांस आणि वाळू वाहतुकीत पोलिसांची हप्तेखोरी उघड करणारा दुसरा ऑडीओ बॉंब
News24सह्याद्री -
गोवंश हत्या आणि गोमांस वाहतुकीला बंदी आहे. पण, ती कागदावरच आहे. अवैध वाळू वाहतुकीचेही तेच! नव्याने हजर झालेले पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या दोन्हींवर आपली करडी नजर असणार असल्याचे जाहीर केले होते. यात दोषी असणार्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्याची गय करणार नाही असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.अप्पर पोलिस अधीक्षक राठोड आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील ऑडीओ बॉंब आणि त्यातून पोलिस दलाची झालेली बेअब्रू ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील अकोले पोलिस ठाण्यातील ऑडीओ बॉंब बाहेर आला आहे.गोमांस वाहतूक करणार्या वाहनाची माहिती अकोले पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस कर्मचार्यांनी त्या वाहनाचा पोलिस गाडीतून पाठलाग केला.
गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडताच संबंधित वाहन चालकाने त्याची माहिती मालकाला दिली. मालकाने लागलीच अकोले पोलिस ठाण्यासाठी कलेक्टर म्हणून काम करीत असलेल्या सचिन शिंदे यास कळविले. सचिन शिंदे यांने अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांना सदर टेम्पो ‘कलेक्शन’ मधील असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी पोलिस वाहनावर चालक म्हणून कार्यरत असणार्या चंद्रकांत सदाकाळ यांना फोन केला. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे. गोमांस करणारा टेम्पो पकडला गेला. मात्र, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी सदर टेम्पो सोडून देण्याचे आणि तसे कंट्रोलला कळविण्याचा सल्लाही दिला. साहेबांचा आदेश कर्मचार्याला मान्य करावा लागला. टेम्पो सोडला गेला.पोलिस दलातील कलेक्टर नावाचा प्राणी जिल्ह्याचे एसपी आणि कलेक्टरपेक्षाही मोठा असतो असं बोलले जाते.
त्याचा प्रत्यय या घटनेत आला. टेम्पो सुटल्यानंतर या कलेक्टर असणार्या सचिन शिंदे याने पोलिस वाहन चालकास फोन केला आणि पोलिस दलात कशी हप्तेखोरी चालते हे सांगितले. या संपूर्ण प्रकरणात पोलिस दलात वाहन चालक असणार्या चंद्रकांत सदाकाळ याचा अडसर येत असल्याचे साहेबांच्या लक्षात आले. साहेबांनी या कर्मचार्यावर वेगळाच आरोप ठेवला. पोलिस चालक चंद्रकांत सदाकळ याच्यावर पोलिस आवारात पकडून ठेवलेल्या गाडीचे टायर चोरीत दोन हजार घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला. यात त्याला निलंबीत करण्यात आले. दरम्यान, पोलिस वाहन चालक सदाकळ याने वाळूची अवैध वाहतूक करणार्या वाळू तस्कराला फोन केला., पोलिस दलात किती आणि कशी हप्तेखोरी चालते त्याचा हा उत्तम नमुना! अधिकारी आणि त्या पोलिस ठाण्याचा कलेक्टर यांच्या संगनमताने कसे आणि कोणते अवैध धंदे चालतात हेही यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
No comments
Post a Comment