Breaking News

1/breakingnews/recent

सारिपाट / शिवाजी शिर्के - मंत्री महोदय, नगरकरांची गंमत पहात असाल तर नगरकर तुमची गंमत करतील याचे भान ठेवा

No comments

सारिपाट / शिवाजी शिर्के -




मुश्रीफ, तनपुरे, गडाख सारेच कसे गायब? पालकमंत्र्यांसह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब, नगरकरांची गंमत पहात असाल तर नगरकर तुमची गंमत करतील याचे भान ठेवा कोरोना महामारीत नगरला कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केल्यास त्यात वावगे वाटू नये अशी आजची परिस्थिती आहे. संसर्ग वाढत चालला आहे आणि रुग्णांना बेड मिळायला तयार नाही. रेमडीसीवर इंजेक्शन भेटायला तयार नाही. ऑक्सीजनची अवस्था सर्वांच्या समोर आहे. यापार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली असताना जिल्ह्याचा पालक कोण असा प्रश्‍न पडला आहे. पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली ते हसन मुश्रीफ हे सपशेल फेल ठरले आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री! बाळासाहेब थोरात यांचा अपवाद केला तर शंकरराव गडाख कोठेच दिसायला तयार नाही. दुसरे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राहुरी गावातच रमले आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळात मामाच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना जबाबदारीची कोणतीही जाण नाही आणि जाणिवही नाही! कोरोना महामारीत रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या मदतील कोणी धावायला तयार नाही. नगरमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना ऑक्सीजन मिळावा यासाठी डॉक्टरांना मंत्री बाळासाहेब थोरात, पोपटराव पवार, अण्णा हजारे आठवले. ते मदतीला धावले असताना पालकमंत्री मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नगरकरांची गंमत पहात होते का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

कोरोना महामारीत जिल्हा प्रशासन नक्की काय करतेय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बैठकांचा सीलसीला चालू असला तरी त्यातून सकारात्मक आऊटपुट निघतंय का तेही पहाणं गरजेचे आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी त्यांचीही दिशाभूल काही विभागाकडून होत असल्याचं आता लपून राहिलेले नाही. ऑक्सीजनच्या मुद्यावर निर्माण झालेली परिस्थिती अवाक्याबाहेर जाण्यास फक्त आणि फक्त औषध प्रशासन कारणीभूत ठरले. नगरमधील हायटेक या ऑक्सीजन पुरवठादाराच्या औषध प्रशासन इतका का पे्रमात पडला याचा शोध घ्यावा असं का कोणालाच वाटले नाही. त्याची क्षमता तपासावी असंही कोणालाच वाटले नाही. अव्वाच्या सव्वा दराने ब्लॅक मार्केटने हाच हायटेक वाला ऑक्सीजन विकू लागला आहे. औषध प्रशासन झोपेचं सोंग घेऊन आहे. मुळात त्यांच्याच आशीर्वादाने हे सारे चालू आहे. ऑक्सीजनच्या गंभीर परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून होतो. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही ही बाब जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नगरमध्ये ऑक्सीजनची परिस्थिती काय आहे असा प्रश्‍न आम्ही जिल्हाधिकार्‍यांना मुलाखतीच्या माध्यमातून विचारला होता. दोन महिन्यात जे समोर आले आहे अत्यंत भयानक आणि विदारक आहे. 

या विषयाला जबाबदार असणार्‍या औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. महूसलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या विषयात लक्ष घातले आहे. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या विषयाचे कोणतेही सोयरसुतक दिसून येत नाही.‘राष्ट्रवादी पुन्हा’ ही कॉलर ट्युन ऐकविण्यात पालकमंत्री मश्गुल आहेत. खरेतर या विषयाबाबत राष्ट्रवादीच जिल्ह्याचं पुढारपण करीत असलेले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालण्याची गरज होती. मात्र, त्यांना राहुरी शहराशिवाय काहीच दिसायला तयार नाही. मामाच्या वशिल्यावर मिळालेले मंत्रीपद जिल्ह्यातील जनतेच्या कामी येणार की नाही असाच काहीसा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. आजच्या महामारीत तनपुरे यांनी नगरला ठाण मांडण्याची गरज होती. प्रशासनाला हाताशी धरत डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय कसा राहिल याची काळजी घेण्याची आवश्यकता होती. हसन मुश्रीफ यांचे वय झाले असल्याने त्यांच्याबाबत समजून घेता येईल! मात्र, प्राजक्त तनपुरे राज्याच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री! मग, त्यांचे हे तरुणपण आजच्या परिस्थितीत कोणाच्या कामाला येतंय हेही तपासण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या प्रशासनावर त्यांची कोणतीही पकड गेल्या दीड वर्षात निर्माण झाली नाही. 

हुजर्‍यांची फौज आणि मागे- पुढे फिरणार्‍या स्वीय सहाय्यकांचा गोतावळा याच्या पलिकडे जिल्हा आहे हे प्राजक्त तनपुरे यांना कदाचित आठवत पण नसेल! जिल्ह्यातील जनता मेटाकुटीला आली असताना जिल्ह्यातील डॉक्टरांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. बेड- औषधांच्या जोडीने आज डॉक्टरमंडळींना चिंता वाटतेय ती ऑक्सीजनची! दोन टँकर आले म्हणजे विषय संपला असे नाही. जिल्ह्याची मागणी ६० केएलची आहे. प्रत्यक्षात त्याच्या साठ टक्के देखील ऑक्सीजन मिळत नाही. बाळासाहेब थोरात यांना सॅल्युट केला पाहिजे. नगर जिल्ह्याला म्हणून ऑक्सीजनचे दोन टँकर मिळाले. हे टँकर नगरकडे येत असताना ते पुणे- नगरच्या हद्दीवर शिरुरमध्ये अडवले गेले. पुण्यातील हॉस्पिटलला हे टँकर वळविण्याचे कारस्थान सुरू झाले आणि याची माहिती बाळासाहेब थोरात यांना मिळताच त्यांनी हे कारस्थान हाणून पाडले. नगरकरांचे पाणी पुणेकर अनेक वर्षांपासून असेच कटकारस्थान करून पळवून नेत आलेत! पुणेकरांची पळवापळवीची ही खोड तशी जुनीच! स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील कायमच पुणेकरांवर या विषयावर तुटून पडायचे! पाणी पळविण्यापर्यंत पुणेकरांची असणारी मजल आता थेट ऑक्सीजनचे टँकर पळविण्यापर्यंत जातेच कशी! अहो, पुणेकर आणि तुमचे दादा मंडळी! नगरमध्ये जनावरे राहतात का? माणसं तडफडून मरायला लागली असताना आपण आमच्या जीवाशी खेळू लागला होतात! थोरात साहेब, बरं झालं तुम्ही देव म्हणून पुढे आलात! तुम्ही ताठर भूमिका घेतली नसती तर आज नगरमध्ये अराजक निर्माण झाले असते. शेकडोजण अमरधाममध्ये गेले असते आणि पुण्याचे हे कारभारी श्रद्धांजलीसाठी आले असते. त्यावेळी त्यांच्याच नगरमधील वाजंत्र्यांनी पायघड्या घातल्या असत्या! थोरात साहेब, आपण जी भूमिका घेतली ती खरोखरच अभिनंदनीय आणि नगरकरांसाठी अभिमानाची आहे. 

जे थोरातांनी केले ते काम पालकमंत्री म्हणवून घेणार्‍या मुश्रीफांना का नाही करावेसे वाटले! मुळात ते हे करूच शकत नाही! कारण, पुणेकर काका-पुतण्यांच्या आशीर्वादाने ते मंत्रीमंडळात आणि नगरच्या पालकमंत्री पदाच्या खुर्चीत आहेत. त्यांना खुर्ची सांभाळयची आहे! जिल्ह्यातील दुसरे मंत्री शंकरराव गडाख स्वत:च कोरोनाचा उपचार घेत आहेत. मात्र, ‘राष्ट्रवादी पुन्हा’ अशी कॉलर ट्युन वाजविणारे प्राजक्त तनपुरे झोपा काढीत आहेत का? मामाच्या वशिल्यावर मिळालेले मंत्रीपद आऊटघटकेचं ठरलं नाही म्हणजे बरे! वेळ अद्यापही गेलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला जनता सहकार्य करीत असली तरी प्रशासनाकडून जे काम होत आहे त्यावर कोणी देखरेख ठेवणार आहे की नाही याबाबतही विचार करावा लागणार आहे. दुसरी लाट सध्या चालू आहे आणि तिसरी येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जे झाले ते झाले! आता यापुढे तरी रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील, बेड मिळतील आणि उपचारात कोणतेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *