पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये चोरांचा चाकूहल्ला, कारचालकाने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवले
मुंबई -
पुण्यामध्ये सोसायटीच्या पार्किंगमधील कार चोरण्याचा प्रयत्न करणार्या चौघा चोरट्यांना कारचालकाने प्रतिकार केला असता तेव्हा चौघांनी त्याला धारदार चाकूने भोसकले. पुण्यातील नऱ्हेगाव भागात सोमवारी पहाटे घटना घडल्यानंतर कारचालक दोन तास रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. आपल्यावर चार चोरांनी हल्ला केल्याचे त्याने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवले. साडेपाचच्या सुमारास सुरक्षारक्षक महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रमोद किसन घारे असे 35 वर्षीय कारचालकाचे नाव आहे. ते नर्हेगाव परिसरातील भुमकर चौकात सिद्धी संकल्प सोसायटीत राहतात. ते शहरातील एका नामांकित कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात.
ही घटना सोमवारी (22 फेब्रुवारी) पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी घारे यांच्या पत्नी कोमल घारे (वय 29) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद घारे हे त्यांच्या कुटुंबियांसह नर्हेगाव येथील सिद्धी संकल्प सोसायटीत वास्तव्यास आहेत. रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या कुटुंबियांसह खडकवासला येथे फिरण्यासाठी गेले होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास पार्किंगमध्ये कसला तरी आवाज सुरु असल्याने प्रमोद यांना जाग आली. त्यांनी गॅलरीतून पाहिले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या स्विफ्ट गाडीच्या दरवाजाशी झटापट करत असल्याचे दिसले. प्रमोद यांनी खाली येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी चोरट्याने प्रमोद यांना मारहाण केली. त्यावेळी त्यांनी देखील चोरट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. हा थरार सुरु असतानाच चोरट्याच्या इतर तीन साथीदारांनी भिंतीवरुन सोसायटीत उडी घेतली. इतर तिघा चोरट्यांनी देखील प्रमोद यांना मारहाण करत निघून जाण्यास सांगितले. मात्र प्रमोद यांनी धाडसाने त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यापैकी एकाने धारदार चाकूने प्रमोद यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसला. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्रमोद जागेवरच कोसळले. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ ते रक्ताच्या थारोळ्यात पडून होते.

No comments
Post a Comment