Breaking News

1/breakingnews/recent

19 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री - पेट्रोल - डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये


TOP HEADLINES


1. खांद्यावरून मिरवणूक काढत, पत्नीकडून पतीचा विजयोत्सव साजरा

पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतांनी विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव केला. ज्यानंतर त्यांच्या पत्नी, रेणुका यांनी थेट आपल्या पतीलाच खांद्यांवर उचलून घेत गावातून फेरी मारली. गुलाल उधळत कार्यकर्त्यांचा कल्ला होणारी विजयी मिरवणूक आजवर सर्वांनीच पाहिली असेल. पण, खुद्द पत्नीनं असा विजयोत्सव साजरा केल्याचं हे दृश्य अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मित आणून गेलं.  

2. पेट्रोल- डिझेलच्या दरांत उच्चांकी वाढ
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात बहुतांश भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली, तर डिझेलचे दरही प्रतिलीटर 80 रुपयांपलीकडेच असल्याचं पाहायाला मिळालं. वाहन इंधनाच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्य वाहन धारकांपुढं आता मोठी आव्हानं उभी करत आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशातही हीच परिस्थिती आहे.  

3. ड्रग्ज प्रकरणात मुंबईमध्ये मोठी घडामोड
गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात मोठमोठ्या कारवाया केल्या जात आहेत. अनेक कलाकारांच्या घरावरही या प्रकरणात  छापेमारी करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग पेडलिंग प्रकरणात मुंबई अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. एनसीबीने मुंबईच्या डोंगरी भागात छापेमारी करून ही कारवाई केली आहे.  

4. आजपासून राज्यात होणार आठवड्यातून चार दिवस कोरोना लसीकरण
देशभरासह राज्यात १६ जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरण मोठ्या जोमात सुरू झाले. मात्र राज्यात 'कोविन' अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणीमुळे कोरोना लसीकरण स्थगित करण्यात आले होते. दरम्यान या 'कोविन अ‍ॅप' मधील तांत्रिक अडचण दूर झाल्या असून राज्यात आजपासून पुन्हा लसीकरणाला नव्या जोमाने सुरुवात करण्यात येणार आहे. यानुसार, राज्यात आठवड्यातून चार दिवसच लसीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे.  

5. शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया - शरद पवार 
उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत "कृषिक" या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते 

6. भुसावळमध्ये हॉटेलवर दरोडा टाकून कॅश लुटली
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील नॅशनल हायवेला लागून असलेल्या पंजाब खालसा हॉटेलवर सहा जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी, हॉटेलच्या कॅश काउंटरची तोडफोड करत रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी, सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

7. पालिका मंडईतील गाळेधारकांचा दंड माफ
कोरोना संकट आणि सॅप प्रणालीच्या नूतनीकरणामुळे विविध परवान्यांचे नूतनीकरण व भाडे शुल्क पालिकेला वसूल करता आले नाही. त्यामुळे वेळेवर भाडे भरता न आलेल्या गाळेधारकांसाठी आकारला जाणारा दंड माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. 

8. आजपासून भाजपच्या संघटनात्मक बैठका 
भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठका आजपासून होत आहेत. त्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे भाजपच्या नरिमन येथील कार्यालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील स्थिती काय होती आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे.  

9. परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  याचा परिणाम परळीतील ग्रामपंचायतींवर होणार का, याची चर्चा रंगली होती. मात्र सोमवारी लागलेल्या निकालाचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं आहे. परळीतील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. त्यामध्ये 6 ग्रामपंचायत पैकी पाच जागेवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनं दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयावर धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.

10.  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनी अखेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मोघम का होईना पण भाष्य केले आहे. त्यांनी मंगळवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 71 ग्रामपंचायतींमध्ये  विजय मिळाल्या दावा केला आहे. तसेच त्यांनी विजयी शिलेदारांचे अभिनंदनही केले आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *