केंद्राचे पथक म्हणजे ‘पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणे’ - रोहित पवार
मुंबई -
रोहित पवार म्हणाले की राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेले केंद्राचे पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणे असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राचे पथक राज्यात आत्ता पाहणीसाठी येत आहे. राज्यातील अतिवृष्टीला दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर केंद्राचे पथक पाहणीसाठी येत आहे यावरुन आता रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.२१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान केंद्राचं पथक राज्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात जो पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्याची पाहणी करायला हे पथक आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ ऑक्टोबरला जनतेला संबोधित करताना सांगितले होते की अवकाळी पावसामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र पथक आले नाही असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यावरुन आता रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.केंद्राच्या पथकाने आता पाहणी करुन काहीही फायदा नाही. दोन महिन्यांपूर्वी जो कापूस खराब झाला होता तो आता भुईसपाट झाला आहे. बाजरीच काढून आता लोकांनी गहू पेरला आहे. त्यामुळे या पथकाला नुकसान कसं दिसणार? असा प्रश्न औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान आजच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकारच्या पथकावर टीका केली आहे. केंंद्राच पथक आज शिवारात जाऊन काय पाहणार असा प्रश्न राजू शेट्टी यांनी विचारला आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांनीही केंद्राच्या पथकावर टीका केली आहे.

No comments
Post a Comment