भाजपला 'भारतरत्न' द्यायला हवा - संजय राऊत
मुंबई -
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका करतानाच आगामी काळात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेतही दिले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जोरदार राजकीय फटकेबाजी केली. महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही. थोडे दिवस थांबा भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना भवनच असणार आहे, असा गौप्यस्फोट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत. तीन पक्ष एकत्र आल्याने आगामी काळात एकाच पक्षातून इनकमिंग होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत आहे. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे, असे राऊत म्हणाले.

No comments
Post a Comment