ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी स्वीकारणार नाही
मुंबई
ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असे म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच पाहिजे यात काहीही शंका नाही. ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीची बैठक पार पडली. या कार्यकारिणीला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याबद्दलच कलम टाकल होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार! भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसंच ते म्हणाले की मला दुसरे आश्चर्य हे वाटते की सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारविरोधात मोर्चे काढण्याचा अधिकार नाही. बाहेर मोर्चे काढून लोकांना भरकटवले जाते आहे. त्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा ठराव तरी मान्य करा.

No comments
Post a Comment