महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक करून पाठीत खंजीर खुपसला आहे., मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचा आरोप
मुंबई -
मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी यावेळी या नेत्यांनी केली. EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.पुण्यातील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर उपस्थित होते. महाविकास आघाडीने वैध मराठा आरक्षणाचा खून केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेला येणार असल्याचं आधी सांगितलं होतं. पण ऐनवेळी ते आले नाहीत.
या वेळी बोलताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या ईडब्लूएस आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे. ईडब्लूएसमध्ये बहुतांश मराठा समाज येत नाही. तसेच यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री हे सर्व समाजाचे असतात. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होऊ देणार नाही, असं विजय वडेट्टीवार नेहमी बोलतात. पण वडेट्टीवार हे न्यायालय आहेत का? वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावत आहेत.

No comments
Post a Comment