माझ्यासाठी 'हा' निर्णय सर्वाधिक समाधान देणारा: मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई: 'राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उद्धव यांनी आज विधानभवनात खास पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी गेल्या १०० दिवसांतील सरकारच्या कामाचा आढावा घेतला. हिवाळी अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. कर्जमुक्ती योजनेचे काम व्यवस्थित सुरू आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. पूर्वीप्रमाणे त्यांना हेलपाटे मारावे लागले नाहीत. रांगेत उभं राहावं लागलं नाही,' असं मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांतील ५ लाख शेतकऱ्यांची यादी तयार आहे. मात्र, आचारसंहितेमुळं आम्ही ती लावू शकलेलो नाही. मात्र, मागील दोन महिन्यांत शेतकऱ्यांनी अजिबात संयम सोडला नाही, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.
No comments
Post a Comment