Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनाची धास्ती गावांपर्यंत

No comments

। शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, मोहोटादेवी मंदिर दर्शनासाठी बंद । ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही बंद
अहमदनगर । न्यूज २४  सह्याद्री - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शहरी भागांपाठोपाठ ग्रामीण भागातही काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच नगरपंचायत, ग्रांमपचायतींच्या आगामी काळातील निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. उर्वरीत नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त होणार आहे. तसेच, यापूर्वी आढळलेला कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद, महानगरपालिका अथवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा स्थगित कराव्यात आणि एकाचवेळी गर्दी किंवा अनेक नागरिकांचा संपर्क येणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचेही श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मंगल कार्यालयांनाही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे ते म्हणाले.
यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत. तसे करणार्‍यावर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची सभा रद्द होण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेनेही आपली सर्वसाधारण सभा रद्द करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. मात्र सभेत अर्थसंकल्प मंजूर करायचा असल्यामुळे सभा महत्वाची आहे. त्यामुळेच सभा रद्द होणार की नाही, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. सभा रद्द झाल्यास अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखाधिकारी मांडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २७ मार्चला होणार आहे. सभा घ्यायची की नाही, याबाबत प्रशासनाचा आदेश आल्यानंतर निर्णय घेऊ, असे अध्यक्ष राजश्री घुले यांनी सांगितले.
भगवानगडाचा नारळी सप्ताह कार्यक्रम रद्द
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचा ८७ वा फिरता नारळी सप्ताह मौजे शिंगोरी ता शेवगाव येथे दि 6 ते 13 एप्रिल रोजी संपन्न होणारा नारळी सप्तहाचा कार्यक्रम कोरोना व्हायरल मुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत संत भगवानबाबा यांनी गावोगावी फिरत नारळी सप्तहाची सुरवात केलेली आहे.
मास्कचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश
दिनांक 13 मार्च ते 30 जून 2020 पर्यत मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांचा समावेश कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आलेला आहे. सर्व मास्क व हॅन्ड सॅनेटाइजरचा अनधिकृत साठा करणे, अधिकत विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे तसेच अयोग्य दर्जा असलेल्या मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांची विक्री करणे या सर्व बाबी जीवनावश्यक वस्तू अधिनियम मधील कलम 3 चे उल्लंघन समजून अधिनियमातील कलम ७ अन्वये कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात येईल. याची सर्व औषध विक्रेते (होलसेलर व रिटेलर) यांनी नोंद घ्यावी. तसेच मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांचा अनधिकृत साठा करणे अधिकृत विक्री किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री करणे व अयोग्य दर्जा असलेल्या मास्क व हॅन्ड सॅनेटाइजर यांची विक्री करणे अशी बाब आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
शिर्डी मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डी साईबाबा मंदिर आज दुपारी ३ पासून दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबरच संस्थानचे प्रसादालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंदिर परिसरात भक्तांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मात्र, मंदिरात आरती व सर्व धार्मिक विधी नियमीत सुरु राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिर्डी साईबाबा विश्‍वस्त समितीने हा निर्णय घेतला आहे. दुपारी तीन नंतर मंदिर दरवाजे बंद करणार असून भक्त निवासही बंद ठेवणार आहेत.
कानिफनाथांच्या समाधीला स्पर्शबंदी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील मढी येथील पंरपरागत कावड यात्रा व फुलोरबाग यात्रा रद्द करण्याचा, कानिफ नाथांच्या समाधीला स्पर्शबंदी तसेच अन्नछत्रही बंद ठेवण्याचा निर्णय कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मढी येथे परंपरेप्रमाणे यात्रा महोत्सवाचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले होते. तसेच नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड व शनिशिंगणापूर तसेच पाथर्डी तालुक्यातील मोहोटादेवी येथील सर्व मंदिराचांचे प्रवेशही बंद करण्यात आले आहे.
न्यायालयाचे कामकाज तीन तास
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज आता सकाळी 11 ते 2 या वेळात तीन तास चालणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर वेळेतच न्यायालयीन सुनावणीचे कामकाज होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी वकीलांसह नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष भूषण बर्‍हाटे यांनी केले आहे.

स्थानिक प्रशासनाला सतर्क करावे : आ. राधाकृष्ण विखे
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर स्थानिक प्रशासनाला सतर्क करावे, आपत्ती व्यवस्थापन म्हणुन जिल्हास्तरावर काही खासगी रुग्णालये ताब्यात घेवून स्वतंत्र कक्ष उभारावेत आणि मास्क व सॅनिटायझरची जादा दराने होणारी विक्री रोखण्यासाठी उपलब्ध साठ्यांवर जिल्हाधिका-यांनी नियंत्रण ठेवावे अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन केली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *